...म्‍हणून वाढतेय न्यायालयात प्रकरणांची संख्या!

न्यायाधीश साजिद आरीफ सय्यद यांची माहिती
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रत्‍येकाला कायद्याची तोंडओळख असणे आवश्यक आहे. अन्यथा आपले अधिकार कळणार नाहीत. न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कमी असून, दिवसेंदिवस प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्‍यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत निरंतर तडजोडीचे प्रयत्‍न करण्यात येतात. यासाठी प्रत्‍येक न्यायालयाच्या समोर अगदी गेटजवळ या प्राधिकरणाचे कार्यालय असते, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव साजिद आरीफ सय्यद यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या सहकार्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या मार्गदर्शनाखाली हतेडी बुद्रूक (ता. बुलडाणा) येथे नुकतेच आझादी का अमृत महोत्‍सवानिमित्त विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले. त्‍यावेळी श्री. सय्यद बोलत होते.  वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी होते. यावेळी दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर एन. बी. चव्हाण यांनी पोटगीचा कायदा या विषयावर माहिती दिली. तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर ए. बी. इंगोले यांनी मुलभूत अधिकारांविषयी माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी महिलांचे आरोग्य आणि आहार या विषयावर मार्गदर्शन केले. वकील संघाचे सचिव ॲड. अमर इंगळे, ॲड. सुभाष विनकर, सरपंच श्रीमती जाधव, सचिव श्री. जाधव आणि दोनशेवर नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन सचिन खरे यांनी केले. जिल्हा विधी प्राधिकरणाचे कर्मचारी सोपान वाठ, हेमंत देशमुख, आकाश अवचार, वैभव मिलके, श्री. नारखेडे, श्री. खंडारे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.