धक्कादायक! पुन्हा कोरोना वाढतोय...!! ६ पाॅझिटिव्‍ह रुग्ण समोर आले

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओमिक्रॉनचे सावट असताना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव काल, 2 जानेवारीला समोर आले. (दर रविवारी बुलडाणा लाइव्ह कार्यालयाला सुटी असल्याने ही बातमी आज देत आहोत.)  जिल्ह्यात तब्‍बल 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यात बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील 2, मलकापूर शहरातील 1, मोताळा शहरातील 1, नांदुरा शहरातील 2 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी वेळीच कोरोनाप्रती अधिक दक्षता बाळगली नाही तर जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करेल, असे म्‍हटले तरी अतिशोक्‍ती ठरणार नाही.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 438 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 432 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 5 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 171 तर रॅपिड टेस्टमधील 261 अहवालांचा समावेश आहे.

उपचार घेणारा एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्‍याला रुग्णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 748457 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत 86987 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 377 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87684 कोरोनाबाधित रुग्ण असून,सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या आता २१ झाली आहे. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.