बिनालाईटीची शाळा !... ग्रामसेवकामुळे यंत्रे धुळखात

येळगावातील प्रकार
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराजवळील येळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा वीजपुरवठा बिल न भरल्याने बंद आहे. त्‍यामुळे शाळेतील यंत्रे शोभेची वस्तू बनल्या असून, सुसज्ज उपकरणे असूनही विद्यार्थी त्‍यापासून वंचित राहत आहेत. शालेय समिती अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवकाची तक्रार केली आहे. ग्रामसेवक गणेश पायघन शाळेचे वीज बिल भरत नाहीत. बिल भरायला सांगितल्यास ते खोटी पोलीस केस करण्याची धमकी देतात, असे तक्रारीत म्हटले आहे.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कापसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की येळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तालुक्यातील एकमेव व्हर्च्युअल क्लासरूम आहे. सुसज्ज संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ई लर्निंग क्लासरूम, आरो फिल्टर या सर्व यंत्रणा शाळेत उपलब्ध आहेत. मात्र ग्रामपंचायत सचिव गणेश पायघन यांनी शाळेचे लाईट बिल न भरल्याने दीड माहिन्यापासून या सुविधा बंद आहेत. याबाबत ग्रामसेवकांना पत्रव्यवहार करूनही मी बिल भरणार नाही, तुम्हाला माझे काय करायचे ते करून घ्या, असे बोलून तुमच्याविरुद्ध खोटी पोलीस केस करेल, अशी धमकी ग्रामसेवकांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही अनिल कापसे यांनी केली आहे.