६८,७५० जणांनी दिलाय तृप्तीचा ढेकर!

जिल्हा रुग्‍णालयात "शिवभोजन' केंद्र ठरतेय गरिबांना आधार!!
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्‍ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोठा आधार ठरत आहे. जय संतोषी माता बहुद्देशीय सरकारी बेरोजगार संस्थेतर्फे या ठिकाणी हे केंद्र चालविण्यात येते.
१ एप्रिल २०२१ पासून सुरू झालेल्या या केंद्रात आतापर्यंत ६८,७५० जणांनी भूक भागविली आहे. शासनाच्या नियमानुसार रोज १२५ जणांना या केंद्रातून १० रुपये इतक्या अत्यल्पदरात जेवण दिले जाते. २ पोळ्या, वरण, भात, भाजी असे पदार्थ जेवणात असतात. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील आणि सीमावर्ती भागातील परजिल्ह्यातील अनेक जण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती अडचणीचीच असते. त्यामुळे जेवणासाठी कधी-कधी त्यांच्याकडे १० रुपये सुद्धा नसतात. अशा वेळी त्यांच्याकडून पैसे न घेता त्यांना जेवण दिले जाते, असे केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. रुग्णाच्या नातेवाइकांना जेवण देताना त्यांचा फोटो घेऊन शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ॲपवर अपलोड करावा लागतो. त्यामुळे काही जण जेवण घेण्यास नकार देत असल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र शासनाचा नियम असल्याने तो पाळावा लागतो, असे केंद्रचालकांनी सांगितले.