"साहेब-भाऊ' हे अशोक स्तंभाचं स्टिकर तुमच्यासाठी नाय..!

वाहतूक पोलिसांचे आमदार-खासदारांकडे सर्रास दूर्लक्ष!!, त्‍यांचे नातेवाइक, काही माजी आमदारही मारत फिरताहेत शान...
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सध्या वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा सपाटा पोलिसांकडून सुरू आहे. आमदार- खासदारांना त्यांच्या वाहनांवर अशोक स्तंभाचे स्टिकर लावण्यास मनाई आहे. तसे करणाऱ्या आमदार, खासदारांवर थेट कारवाई करावी, याबाबतचा आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला वरिष्ठ स्‍तरावरून १० डिसेंबरलाच मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. ते अथवा त्‍यांचे नातेवाइक इतकेच काय अनेक माजी आमदारही सर्रास वाहनावर अशोक स्तंभाचे स्टिकर लावून फिरत असल्याचे दिसून येत आहे.

आमदार -खासदार, त्यांचे नातेवाइकही वाहनांवर अशोक स्तंभाचे स्टिकर लावताना दिसतात. मात्र असे स्टिकर लावण्याचा अधिकार आमदार आणि खासदारांना नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक राम वाधवा यांनी केली होती. वाहनांवर अशोकस्तंभ लावण्याचा अधिकार केवळ पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, राज्यसभेचे उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती यांना असतात.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती, राज्यातील मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, उपसभापती हे केवळ त्यांच्या राज्यात अशोक स्तंभ वाहनावर लावू शकतात असा नियम आहे. मात्र सध्या आमदार आणि खासदारांकडून सुद्धा वाहनांवर अशोकस्तंभ लावले जात असल्याने या चिन्हाचा अपमान होत आहे. वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी, टोल चुकवण्यासाठी सुद्धा अशा स्टिकरचा वापर अनेकदा होत असल्याचे दिसते. जिल्ह्यातील अनेक माजी आमदारांच्या वाहनांवर सुद्धा हे स्टिकर आहे. जिल्ह्यातील जवळपास शेकडो गाड्यांवर अशोक स्तंभाचे स्टिकर असले तरी मात्र एकावरही कारवाई झाली नाही.

ही गाडी कोणाची?
बुलडाणा शहरातील चिखली रस्त्यावर एक जीप उभी दिसली. महिंद्रा कंपनीच्या जीपवर लोकसभा सदस्य आणि अशोकस्तंभाचे स्टिकर लावलेले होते. गाडी क्र. एमएच २८ बीएम ८८९९ या क्रमांकाची गाडी कुणाची याची माहिती घेतली असता धीरज पंजाबराव जाधव या व्यक्तीच्या नावावर ही गाडी असल्याचे समोर आले. महाराष्ट्रात तसेच देशातही धीरज पंजाबराव जाधव नावाचा कोणताही व्यक्ती लोकसभेचा सदस्य नसताना लोकसभा सदस्य आणि अशोक स्तंभ लावले कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. माहितीअंती खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुतण्याची ती गाडी असल्याचे समोर आले. अशी शेकडो वाहने रस्त्यावर फिरत असताना वाहतूक पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

cr