रविकांत तुपकरांचा अन्‍नत्‍याग सत्‍याग्रह मागे!

मंत्रालयात मागण्यांसंदर्भात बुधवारी बैठक, केंद्राच्या मागण्यांबाबत शिष्टमंडळ पाठवणार, फडणवीसांनीही केंद्राच्या नेत्‍यांशी चर्चा करण्याची दिली ग्वाही, दिल्लीला तुपकरांना सोबत घेऊन जाणार!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वादग्रस्त तीन कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा विजय झाला म्‍हणून राज्‍यभर ढोल बडवणाऱ्या राज्य सरकारमधील नेत्यांनी बुलडाण्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मात्र दुर्लक्ष चालवले होते. याबद्दल टीका सुरू होताच आणि आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने हादरून गेलेल्या राज्य सरकारने तातडीने बुलडाण्यातील आंदोलन संपविण्यासाठी पावले उचलली. आज, २० नोव्‍हेंबरला अन्‍नत्‍याग सत्याग्रहाच्या चौथ्या दिवशी आंदोलन अधिक भडकण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्‍यांनी मागण्यांसंदर्भात बुधवारी, २४ नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक आयोजित केल्याची माहिती दिली. बैठकीचे निमंत्रणही तुपकरांना दिले. केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ दिल्लीला पाठवण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचेही ते म्‍हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तुपकरांना फोन करून केंद्र सरकारकडे असलेल्या मागण्यांबाबत आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यास जाऊ व त्‍यांच्‍याकडे मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्‍न करू, असे आश्वासन दिले. आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन डॉ. शिंगणे यांनी दिले व तुपकरांना अन्‍नत्‍याग मागे घेण्याची गळ घातली. सोबत मंत्रालयातील बैठकीचे पत्रही दिले. त्‍यांची ही विनंती मान्य करून तुपकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. पालकमंत्र्यांनी शरबत पाजून त्‍यांचा अन्‍नत्‍याग संपुष्टात आणला. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा मोठा लढा उभारण्यात येईल, पुन्‍हा रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला.

tus

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आरपारची लढाई सुरू केली होती. नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्‍नत्याग आंदोलनामुळे जिल्ह्यात वातावरण तणावग्रस्त झाले हाेते. आधी नागपुरात तुपकरांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र नागपूर पोलिसांनी त्‍यांना अटक करून बुलडाण्यात आले. १८ नोव्‍हेंबरपासून बुलडाण्यात आंदोलन सुरू होते. आंदोलन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपासून उपाशी असल्याने तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली होती. आज त्‍यांच्‍या अन्‍नत्‍यागाचा पाचवा दिवस असल्याने तब्‍येत जास्तच खराब होण्याची शक्‍यता होती आणि त्‍यामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्‍थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. त्‍यामुळे कोणत्याही परिस्‍थितीत आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी प्रशासकीय आणि राज्य सरकारकडून प्रयत्‍न सुरू झाले. तुपकरांची प्रकृती खालावत असताना गावागावात सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. काल मोताळा येथील शेख रफीक या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळून घेण्याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यांना रोखण्यात आले. मात्र शेतकऱ्यांचा संताप अनावर होऊन त्‍यांनी चिखली रस्ता रोखला होता. यावेळी आंदोलन आणि पोलिसांत राडा झाला होता. पोलिसांची व्हॅनही शेतकऱ्यांनी फोडली होती. रात्री उशिरा बुलडाणा तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्‍न झाला. बुलडाणा- मलकापूर मार्गावरील वाघजळ फाट्याजवळसुद्धा एक ट्रक पेटवून देण्यात आला होता.

या घटना पाहता आज आंदोलनाचा भडका उडण्याची शक्‍यता नाकारता येत नव्‍हती. संवेदनशील पालकमंत्र्यांनी या सर्व घटना लक्षात घेऊन ॲक्‍शन मूडमध्ये येत तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तुपकरांच्या मागण्यांबद्दल २० मिनिटे चर्चा केली. त्‍यातून २४ नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक लावण्याचा निर्णय झाला. तुपकरांना या बैठकीचे निमंत्रण तातडीने द्या, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्‍यानुसार पत्र घेऊनही पालकमंत्री सकाळी साडेनऊच्या सुमारास आंदोलनस्थळी आले. त्‍यांनी तुपकरांना उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन अन्‍नत्‍याग मागे घेण्याबद्दल विनंती केली. तत्‍पूर्वी तुपकरांनी जबरदस्ती सहन करणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. कोणतीही सोयापेंड देशात आयात करणार नाही, असा शब्द केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याचे राजू शेट्टी यांनी तुपकरांना सांगितले. केंद्राकडील मागण्यांसंदर्भात मी केंद्राच्या नेत्‍यांशी चर्चा करताे. तुम्हाला सोबत घेऊन दिल्ली जाऊ, असे फडणवीसांनी त्‍यांना सांगितले. पालकमंत्री डॉ. शिंगणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तुपकरांनी आंदोलन स्‍थगित केल्याची घोषणा केली. यावेळी रविकांत तुपकर भावुक झाले. त्‍यांना अश्रू अनावर झाले होते. प्रसारमाध्यमांनी या लढ्याला दिलेल्या बळाबद्दल आभार मानत, राजू शेट्टींनी दिवसातून १० वेळा माझ्या तब्येतीची चौकशी केल्याचे ते म्‍हणाले. यावेळी कार्यकर्तेही रडले. डॉ. शिंगणे यांनी १० वाजून ३४ मिनिटांनी तुपकरांना शरबत पाजून अन्‍नत्‍याग सोडवला. त्‍यानंतर रुग्‍णवाहिकेतून त्‍यांना जिल्हा रुग्‍णालयात हलविण्यात आले.

आंदोलन संपविण्याची तयारी...
अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तुपकरांच्या निवासस्थानासमोर सकाळीच दाखल झाले होते. आंदोलन संपुष्टात आणण्याच्या इराद्याने जिल्हा रुग्णालयात विशेष अतिदक्षता कक्षही तयार ठेवण्यात आला होता. रुग्‍णवाहिकाही आंदोलनस्‍थळी आणण्यात आली. तहसीलदार रुपेश खंडारे, जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनाही आंदोलनस्‍थळी बोलाविण्यात आले होते. तुपकरांचे आई-वडील, पत्नी, कुटूंबीय, शेकडो कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या उपस्‍थितीत अन्‍नत्‍याग मागे घेण्यात आला. , पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

रविकांत तुपकर, शर्वरी तुपकर यांच्याविरुद्ध गुन्‍हे दाखल
काल आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारी वाहन फोडण्यात, जाळण्यात आले. त्‍यामुळे पोलिसांनी रविकांत तुपकर आणि शर्वरी तुपकर यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत. त्‍यांच्‍यासह कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल झालेले गुन्‍हे मागे घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. शिंगणे हे गृहमंत्री वळसे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.

प्रशासनाने दिलेले पत्र :

patr

पहा व्हिडिओ ः