आंदोलनकर्त्यांवर दबाव! २ दिवसांत ७४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी सध्या संपावर आहेत. कर्मचारी संप मागे घेत नसल्यामुळे जिल्ह्यातील तीन आगारातील ३३ कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने काल, १० नोव्हेंबर रोजी कारवाई करून धाक दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज, ११ नोव्हेंबर रोजी सुद्धा आंदोलन "जैसे थे' राहिल्याने उर्वरित चार आगारांतील ४१ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दोन दिवसांत एकूण ७४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याने हे प्रकरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.
निलंबनाच्या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांत संताप आणखी वाढला आहे. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच कारवाईचा भाग म्हणून काल, १० नोव्हेंबर रोजी मेहकर आगारातील १४, खामगाव आगारातील ९, चिखली आगारातील १० अशा एकूण ३३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. आज बुलडाणा आगारातील ११, मलकापूर आगारातील ५, जळगाव जामोद आगारातील १० आणि शेगाव आगारातील १५ अशा एकूण ४१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत जिल्ह्यातील ७४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली.