प्रा. डी.एस. लहानेंच्या पुढाकारातून बुलडाण्यात पार पडली विधवा महिला परिषद! विधवा भगिनी अडचणी सांगताना ढसाढसा रडल्या;

आ.डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, विधवांच्या सक्षमीकरणासाठी विधानभवनात आवाज उठवणार! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले,समाजाने मानसिकता बदलण्याची गरज, विधवा भगिनींना सहानुभूतीची नव्हे तर आधाराची गरज...
 
बुलडाणा(अभिषेक वरपे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रा. डी.एस.लहाने यांच्या पुढाकारातून शिवसाई पतसंस्था आणि मानस फाऊंडेशनच्या विद्यमाने बुलडाण्यात आज,१० डिसेंबरला विधवा परित्यक्ता महिला परिषद पार पडली. तुलसी नगरातील शिवसाई ज्ञानपीठ समोरील मैदानात पार पडलेली ही परिषद ऐतिहासिक ठरली. महात्मा फुलेंनंतर तब्बल १०० वर्षांनी अशा परिषदेचे आयोजन झाले होते. विधवा, घटस्फोटित आणि परितक्ता (नवऱ्यापासून विभक्त राहणाऱ्या) शेकडो महिलांनी या परिषदेला हजेरी लावली. आ. डॉ राजेंद्र शिंगणे ,जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील आवर्जून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विधवा महिलांनी त्यांना येणाऱ्या अडचणी कथन केल्या, समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना कसे दूर ठेवले जाते हे सांगताना अनेक विधवा भगिनी ढसाढसा रडल्या. यावेळी परिषदेत उपस्थित मान्यवरांसह अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. याप्रसंगी विचार पिठावर ज्येष्ठ साहत्यिक इंदुमती लहाने, शिवसाही पतसंस्थेचे डॉ. चिंचोले उपस्थित होते. सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांची भाषणे झाली.
        
विधवा भगिनींनी निर्भीडपणे जीवन जगावं तसेच समाजातील लोकांनी सुद्धा विधवा, परित्यक्ता महिलांना शुद्ध भावनेने स्वीकारून घ्यावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी केले. आपण एकटे राहू शकत नाही हा न्यूनगंड महिलांनी काढून टाकावा. समाजानेही विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पाटील म्हणाले.
    समाजकारणाची व्याख्या म्हणजे हा कार्यक्रम : आ. डॉ. राजेंद्र शिंगणे
 
  "आतापर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो, कित्येक कार्यक्रम पाहिले पण आजचा सोहळा खऱ्या अर्थाने समाजकरणाची व्याख्या ठरलेला आहे." असे म्हणत आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी परिषदेचे आयोजक प्रा. डी.एस. लहाने यांच्या आयोजनाचे कौतुक केले. विधवा भगिनींनी स्वतःला कधीच अनाथ समजू नये, आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत. असा शब्द यावेळी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला. विधवा महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विधानभवनात आवाज उठवणार असल्याचेही डॉ.शिंगणे म्हणाले.
विधवा भगिनींच्या समस्या वेदनादायी; त्यांच्यासाठी सदैव मदतशील राहणार- प्रा.डी. एस. लहाने
"विधवा परितक्त्या भगिनींनी जेव्हा माझ्यासमोर समस्या मांडल्या, त्यावेळी मनाला अत्यंत वेदना देणारी त्यांची कथा आहे, असे लक्षात आले. अनेक महिलांनी माझ्यासमोर त्यांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार" असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक डी. एस. लहाने यांनी सांगितले.
पांढऱ्या सपाट पावलांची म्हणून हिणवू नका ..
यावेळी अनेक विधवा महिलांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या.
पांढऱ्या पायाची, सपाट पावलांची म्हणून आम्हाला हिवणल्या जाते, कुठल्याही शुभ कार्यापासून दूर ठेवल्या जाते आम्हाला शुद्ध भावनेने कधी स्वीकारणार? असा सवाल यावेळी विधवा महिलांनी उपस्थित केला. यावेळी भावना व्यक्त करतांना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.