बुलडाण्यात बावनकुळे यांच्या विरोधात पत्रकारांचे गांधीगिरी आंदोलन; भाजप कार्यकर्त्यांना ५२ खुळे धाब्यावर जेवणाचे दिले निमंत्रण
Updated: Sep 27, 2023, 18:24 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात संपूर्ण राज्यभर पत्रकारांमध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर बुधवारी बुलढाण्यातील पत्रकारांनी गांधीगिरी आंदोलन केले. याद्वारे भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धाब्यावर जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी आगळीवेगळी निमंत्रण पत्रिका तयार केली. त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, अलीकडच्या काळामध्ये ५२खुळे यांच्या वाणीला पत्रकारांच्या संदर्भात अप्रतिम घुमरे फुटत आहेत. त्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना अफलातून सल्ला देत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करत त्यांच्या फोटोला नैवेद्य दाखवून ५२ खुळे वैकुंठधाम धाब्यावर सस्नेह भोजनाचे निमंत्रण देण्यात येत आहे. अशाप्रकारची निमंत्रण पत्रिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी पत्रकार गणेश निकम, लक्ष्मीकांत बगाडे, सोहम घाडगे, संदीप वानखेडे, गणेश उबरहंडे, शोकत शहा, राम हिंगे, संदीप वंत्रोले यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.