९ पालिकांमध्ये आता "प्रशासक राज'! ९ अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

 
file photo
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 5 वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून येत इतिहास घडविणारे नगराध्यक्ष आता (तूर्तास) इतिहास जमा झालेत! त्यांचा कार्यकाळ संपल्याने नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी आज, ४ जानेवारीला पदाचा प्रभार स्वीकारला असून, आता पालिकेत प्रशासक राज सुरू झालाय!!

जिल्ह्यातील 9 पालिकांची मुदत 3 जानेवारी 2022 रोजी संपली आहे. मात्र या निवडणुकांची पूर्वतयारी न झाल्याने व ओमिक्रॉनची धास्ती, ओबीसी आरक्षण आदी कारणांमुळे पालिकावर प्रशासक नेमण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. यामुळे नगरविकास खात्याने प्रशासक नियुक्त केले. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी या आशयाचे आदेश जारी केल्यावर, 9 अधिकाऱ्यांनी आज प्रशासक पदाची सूत्रे  स्वीकारली.

हे आहेत प्रशासक...
एसडीओ भूषण अहिरे व वैशाली देवकर यांनी अनुक्रमे देऊळगाव राजा, जळगाव जामोद पालिका प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली. तहसीलदार  संजय गरकल यांनी मेहकर तर आर. व्ही. सुरडकर यांनी मलकापूर पालिकेचा प्रभार सांभाळला. 5 ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासक पदाची सूत्रे  हाती घेतली. बुलडाणा येथे गणेश पांडे, चिखलीत आकाश सुरडकर, नांदुऱ्यात आशिष बोबडे, शेगावात प्रशांत शेळके तर खामगाव पालिकेत मनोहर आकोटकर यांनी प्रभार स्वीकारला.