बुलडाण्यात मुस्लिम बांधवांच्या बंदला चांगला प्रतिसाद!

दिवसभर धरणे दिल्यानंतर संध्याकाळी निघाला मोर्चा!!
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्रिपुरा राज्‍यातील अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या अत्‍याचाराची उच्‍चस्‍तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करत आज, १२ नोव्‍हेंबरला मुस्लिम बांधवांनी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. जिल्हाभरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील तालुक्‍याची शहरे, मोठ्या गावांतील मुस्लिमबहुल भागातील दुकाने पूर्णपणे बंद होती. बुलडाणा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकादमीतर्फे दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. त्‍यानंतर जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास शहरात मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला.

morcha

त्रिपुरा राज्यातील हिंसाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी रजा अकादमीच्या निवेदनात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हा सचिव रईसोद्दीन काझी, शेख नदीम, सय्यद समीर, जुबेर शेख, कारी कलीम रिजवी, हाफिज कमरुज्जमा रिजवी आदीं अन्य पदाधिकारी उपस्‍थित होते. बुलडाणा शहरात बंदला मुस्लिमबहुल भागात चांगला प्रतिसाद मिळाला. इंदिरानगर भागातून इंदिरानगर एकता कबीलातर्फे मोर्चा काढण्यात आला. मोर्चा इंदिरानगर येथून सुरू होऊन बसस्‍थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

morcha

मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांना देण्यात आले. निवेदनात म्‍हटले आहे, की त्रिपुरा राज्यात मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असून, अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांना आगी लावून देण्यात आल्या. या घटना त्वरित थांबविण्यात याव्यात. त्रिपुरा सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी. निवेदन देताना समीर खान, मोहम्मद युनुस, यूसुफ खान, डॉ. मोबिन खान, शाकिर रजा, वाजिद शेख, अस्लम शाह, जावेद खान उपस्थित होते. मोर्चात मोठ्या प्रमाणात युवावर्ग सहभागी झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

mochan