कैद्यांच्या श्रमातून जिल्हा कारागृहात फुलला मळा!

Buldana Live Possitive Story : काशिफळ, दुधी भोपळ्याचे हजारो क्विंटल उत्‍पन्‍न!!
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कळत-नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यांमुळे बंदिवास नशिबी आलेला असला तरी काहींचे कष्टाळू हात शांत थोडीच बसणार? त्‍यांनी घाम गाळून बुलडाण्याच्या जिल्हा कारागृहात चक्क भाजपाल्याचा मळा फुलवला आहे. कारागृह परिसरातील थोड्याशा जमिनीवर काशीफळ, दुधी भोपळ्याचे हजारो क्विंटलचे उत्पादन घेण्यात येत आहे. कैद्यांना रोज मिळणाऱ्या  जेवणात त्यांनीच मेहनतीने पिकवलेल्या या भाज्यांमुळे गोडवा निर्माण झाला आहे.

जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या परिश्रमातून ४ हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. सोयाबीनची कापणी झाली असून, मळणी अद्याप व्हायची बाकी आहे. याशिवाय काशीफळ, दुधी भोपळा, वांगी, टोमॅटो, फुल गोबी, चारा पिकेही जिल्हा कारागृहात घेण्यात आली आहेत. काशीफळ आणि दुधी भोपळा या दोन पिकांची लागवड मे महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर तीन महिन्यांत या दोन्ही पिकांचे हजारो क्विंटल उत्पादन घेऊन कैद्यांच्या जेवणात गोडवा निर्माण करण्यात आला.

५० गुंठे क्षेत्रफळावर काशिफळाची लागवड करण्यात आली होती. जुलै महिन्यात काशिफळाचे ३५ किलो तर नंतरच्या काळात अडीच हजार क्विंटल उत्पादन घेण्यात आले. ३० गुंठे क्षेत्रफळावर दुधी भोपळा लावण्यात आला. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दुधी भोपळ्याचे  साडेतीनशे किलो म्हणजेच साडेतीन क्विंटल उत्पादन निघाले. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून ३० गुंठ्यात वांगी, ३० गुंठ्यात टोमॅटो, ३० गुंठ्यात फुलगोबी तर अर्ध्या एकरात चारावर्गीय पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात वांगी, टोमॅटो, फुलगोबी या भाज्या कारागृहातील कैद्यांच्या जेवणाची चव वाढवणार आहेत.