फायरब्रॅण्ड किरीट सोमय्या उद्या बुलडाण्यात; बुलडाणा अर्बनमध्ये जाणार!

५३ कोटींचे गौडबंगाल उलगडणार?
 
 
kirit somayya
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपाचे फायरब्रॅण्ड नेते किरीट सोमय्या उद्या, १२ नोव्‍हेंबरला बुलडाणा शहरात येणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजीच त्यांनी शुक्रवारी बुलडाण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. उद्या ते पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे सोमय्यांच्या रडारवर नक्की कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. बुलडाणा अर्बन पतसंस्थेत आलेले ५३ कोटी रुपये कुणाचे आहेत, असा सवाल सोमय्या यांनी ७ नोव्हेंबर रोजी केला होता. हे पैसे कुणाचे आहेत हे जाणून घेण्यासाठी सोमय्या ९ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते. त्यानंतर उद्या ते बुलडाण्यात येणार असून, ५३ कोटी कुणाचे यावर ते खुलासा करण्याची शक्यता आहे.

२७ ऑक्टोबर रोजी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात आयकर विभागाने तपासणी केली होती. यावेळी एकाच शाखेत १२०० खाती पॅनकार्डशिवाय असल्याची माहिती समोर आली होती. आयकर विभागाने या खात्यांतील व्यवहार रोखले असून, ५३ कोटी रुपये जप्त केल्याचेही सोमय्या म्हणाले होते. हे पैसे ठाकरे सरकारच्या एका मंत्र्याचे असल्याचे कळत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. बुलडाणा अर्बन सहकारी पतसंस्थेच्या या व्यवहारांची पतसंस्थेच्या अध्यक्षांना जाण असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला होता. याच संस्थेकडून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना ७० कोटी रुपयांचे कर्ज अपारदर्शक पद्धतीने दिल्याचेही सोमय्या म्हणाले होते. या प्रकाराचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या ८ नोव्हेंबर रोजी दिल्लीला गेले होते. तिथे सहकार मंत्रालय, ED अशा विभिन्‍न विभागाच्या अधिकाऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या होत्या. याचा पाठपुरावा करण्यासाठी बुलडाणा येथे जाणार असल्याचेही सोमय्या म्हणाले होते. त्‍यानुसार ते बुलडाण्यात येणार होते.

असा आहे सोमय्यांचा दौरा...
उद्या, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी रेल्वेने सोमय्या शेगाव येथे पोहोचणार आहेत. तेथून सकाळी ११ वाजता कारने बुलडाणा येथे येणार आहेत. विश्रामगृहावरून भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यानंतर ते बुलडाणा अर्बन पतसंस्थेला भेट देणार असून, बँकेच्या मुख्य कार्यकारी संचालकांशी चर्चा केल्यानंतर दुपारी २ वाजता भाजपच्या शहर कार्यालयात ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

आयकर विभागाच्या प्रसिद्धीपत्रकाशी आरोपांचे साम्य...
गेल्या महिन्याच्या शेवटी (२७ ऑक्‍टोबर) राज्यातील सर्वांत मोठ्या पतसंस्थेच्‍या मुख्यालय आणि अध्यक्षांच्या निवासस्थानी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाच्या चौकशीत ५३.७२ कोटी रुपयांचा हिशोब लागला नाही आणि त्‍याबद्दल या पतसंस्थेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी काहीच सांगू शकले नव्‍हते. पतसंस्थेचे अध्यक्ष आणि एका संचालकाच्या निवासस्‍थानीही ही कारवाई करण्यात आली होती. कोअर बँकिंग सोल्युशन आणि (CBS) बँक डेटाच्या विश्लेषणावरून आणि कारवाईदरम्यान नोंदवलेल्या महत्त्वाच्या अधिकारिक व्यक्तीच्या जबाबावरून बँकेत खाती उघडण्यात मोठी अनियमितता झाल्याचे उघड झाल्याचे समोर आले होते. या पतसंस्थेच्‍या एका शाखेत १२०० पेक्षा अधिक खाती पॅनकार्डशिवाय उघडण्यात आली. केवायसी नियमांचे पालनही यासाठी करण्यात आलेले नसल्याचे समोर आले होते. ही सर्व खाती उघडण्याचे फॉर्म बँक कर्मचाऱ्यांनीच भरले होते. त्यांनीच स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे लावले असल्याचेही निदर्शनास आले होते. या सर्व खात्यांमध्ये प्रत्येकी १.९ लाख रुपयांच्या ठेवी असे एकूण ५३.७३ कोटी आढळले आहेत. या पद्धतीची ७०० बँक खाती अशी समोर आली आहेत. ऑगस्ट २०२० ते मे २०२१ या कालावधीत बँक खाते उघडल्यापासून सात दिवसांच्या आत या खात्यात ३४.१०  कोटी रुपये ताबडतोब आले. २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवींसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. ते टाळण्यासाठी या खात्यांची रचना करण्यात आल्याचे आयकर विभागाच्या तपासणीत समोर आले. नंतर त्याच शाखेत हे पैसे मुदत ठेवींमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्‍हणजे चौकशीत खातेदारांना बँकेतील रोख ठेवींची  माहितीच नसल्याचे समोर आले आहे. या रोख ठेवींचे स्तोत्र चेअरमन, सीएमडी आणि शाखेचे मॅनेजर स्पष्ट करू शकले नाहीत. बँकेच्या एका संचालकांच्या सांगण्यावरून हा सर्व व्यवहार झाल्याचे चेअरमन, सीएमडी व मॅनेजरने मान्य केले. हा संचालक धान्याचा प्रमुख व्यापारी आहे. जमा करण्यात आलेले पुरावे आणि जबाबाच्या आधारे ५३.७२ कोटी रुपये रोखण्यात आले आहेत. सध्या पुढील तपास सुरू आहे, असे केंद्र सरकारच्या प्रेस इन्‍फॉर्मेशन ब्‍युराेने यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले होते. या प्रसिद्धीपत्रकातील कारवाईचा भाग आणि सोमय्यांच्या आरोपांत साम्य आहे हे विशेष.