Buldana Live Exclusive : 10 दिवसांतच 10 हजारांवर पॉझिटिव्ह! 54 जणांचा मृत्यू!! बाकी संचारबंदी, लॉकडाऊन, कर्फ्यू, कडक निर्बंध कायम

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवसा संचारबंदी, रात्री कडक कर्फ्यू अन् बहुतांश दुकानदार व व्यावसायिकांच्या जीवावर उठलेला कडक लॉकडाऊन हे सर्व काही सुरू आहे. मात्र या सर्व उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा विस्फोटक प्रकोप अन् मृत्यूचे तांडव सुरूच आहे. केवळ गत 10 दिवसांतील आकडे लक्षात घेतले तरी कोरोना ऊर्फ कोविडचा दिवसाढवळ्या धुमाकूळ …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दिवसा संचारबंदी, रात्री कडक कर्फ्यू अन्‌ बहुतांश दुकानदार व व्यावसायिकांच्या जीवावर उठलेला कडक लॉकडाऊन हे सर्व काही सुरू आहे. मात्र या सर्व उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा विस्फोटक प्रकोप अन्‌ मृत्यूचे तांडव सुरूच आहे. केवळ गत 10 दिवसांतील आकडे लक्षात घेतले तरी कोरोना ऊर्फ कोविडचा दिवसाढवळ्या धुमाकूळ बिनदिक्कत सुरू आहे. रात्रीही कितीही फौजफाटा नेमला तरी त्याला कुणीच अडवू शकत नाही हेच धोकादायक चित्र समोर येत आहे.

राज्य शासनाने अधिक कडक निर्देश जारी केले, जिल्हा प्रशासनाने 16 एप्रिलपासून त्याची कडक अंमलबजावणी केली. या पार्श्वभूमीवर 16 ते 25 एप्रिल दरम्यानच्या आकडेवारीचा विश्लेषण वजा आढावा घेतला तर भीषण आकडेवारी समोर येते. या जेमतेम 10 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 10 हजार 223 कोरोना पॉझिटिव्हची नोंद  झाली आहे. 19 ते 22 एप्रिल दरम्यानचा अपवाद वगळला तर इतर 6 दिवस 4 आकड्यांतच रुग्ण आले आहेत. 17 एप्रिलला सर्वाधिक म्हणजे 1285 रुग्णांची नोंद झाली. 25 तारखेला 1264, 24 तारखेला 1080, 23 तारखेला 1035, 18 तारखेला 1018 आणि 16 तारखेला 1140 अशी रुग्णसंख्या आहे. केवळ 10 दिवसांतच 10 हजार 223 म्हणजे सरासरी 1022 पॉझिटिव्ह असा कोरोनाचा झंझावात आहे.

मृत्यूचे तांडव

दरम्यान या अल्प अवधीतच  कोरोना बाधित होण्याची गती वाढली असतानाच मृत्यूचे तांडव देखील पहावयास मिळाले. या काळात तब्बल 54 व्यक्तींचा बळी गेल्याचे वृत्त आहे. 21 एप्रिलला सर्वाधिक म्हणजे 12 जणांचा मृत्यू झालाय! 25 तारखेला हा आकडा 8 इतका आला. याखालोखाल 17, 18 व 20 तारखेला  प्रत्येकी 6 जण दगावले. 23 तारखेला 5 तर 16 तारखेला 4 जणांचा मृत्यू झाला.