बुलडाणा वकील संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

पुन्हा एका वकिलावर प्राणघातक हल्ला!; वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याची मागणी
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालू वर्षात वकिलांवर प्राणघातक हल्ले करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. यवतमाळ येथील अशीच एक घटना त्याचे दुर्दैवी उदाहरण होय. या घटनेचा बुलडाणा वकील संघाने तीव्र निषेध केला असून, तातडीने कारवाई व न्याय देण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांना केली आहे.
यवतमाळ येथील ॲड. देशमुख यांच्यावर तीन दिवसांपूर्वी समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल होऊनही अजूनही अटक करण्यात आली नसून ते फरारी आहेत. यामुळे त्यांना जेरबंद करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज, १७ नोव्‍हेंबरला पाठविण्यात आले. वाढत्या घटना लक्षात घेता  महाराष्ट्र विधी मंडळात ॲडव्हॉकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली. निवेदनावर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय हिंमतराव सावळे, सचिव ॲड. अमर इंगळे यांच्यासह १२३ वकिलांच्या सह्या आहेत.