बुलडाण्यात तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

शेतकरी आंदोलन भडकले!; वाघजाळ फाट्याजवळ ट्रक पेटवला!!
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा प्रशासनाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्‍नत्याग सत्याग्रहाकडे चालवलेले दुर्लक्ष आंदोलनाला वेगळ्या वळणावर घेऊन जाते की काय, अशी भीती निर्माण व्हावी अशा घटना काल दिवसभरात घडल्या. रात्री उशिरा आंदोलनाचे हाती आलेले शेवटचे अपडेट ही भीती गडद करणारे ठरले. रात्री उशिरा बुलडाण्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांचे शासकीय वाहन जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. वेळीच धावून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आग विझवली. रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. त्याचवेळी बुलडाणा-मलकापूर  मार्गावरील वाघजळ फाट्याजवळसुद्धा एक ट्रक पेटवून दिल्याची घटना साडेअकराच्या सुमारास समोर आली.

तुपकरांच्या सत्याग्रहाला आज, २० नोव्हेंबरला चौथा दिवस उजाडला आहे. त्‍यांची प्रकृती काल सकाळपासून खालावलेली आहे. त्‍यामुळे शेतकरी, कार्यकर्ते संतप्त झाल्याचे सकाळपासून पहायला मिळाले. रास्ता रोको आंदोलनामुळे आंदोलनाची तीव्रताही दिसून आली. संध्याकाळी शेतकरी आणि पोलिसांत झालेल्या राड्याने आंदोलनाची दिशा बदलत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. स्वतः तुपकर यांनी रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केल्याने आणि पोलिसांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्याने हा संघर्ष तिथेच थांबला असला तरी प्रशासनाच्या विरोधातील संताप आंदोलनकर्त्यांत कायम आहे. कायदा सुव्यवस्‍था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्‍न सुरू आहेत. हा संघर्ष पोलिसांशी नसून, सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी असल्याचे तुपकरांनी सांगितले. मात्र आंदोलनाकडे प्रशासनाने दूर्लक्ष चालवल्याने आंदोलक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मानसिकता बिघडत चालल्याचे रात्री उशिराच्या दोन घटनांतून समोर आले आहे. वाहने जाळणे हा शेतकऱ्यांचा उद्रेक होता की आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कुणी हे कृत्‍य केले, हे तपासानंतरच समोर येईल. दरम्‍यान, घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.