अरेच्‍चा... चिखली नगरपरिषदेला चक्क विरोधी पक्षनेताच नाही!

 
चिखली नगरपरिषद
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोप-प्रत्‍यारोपांच्या खेळामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष चिखलीच्या राजकारणाकडे लागलेले असते. ऑक्‍टोबर हिटमध्ये चिखलीत रंगलेली राजकीय गरमागरमी पार राज्‍यभरात चर्चेला गेली. या सर्व उलथापालथीत मात्र चिखली नगरपरिषदेला आता विरोधी पक्षनेताच राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व त्‍यांचे पती कुणाल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्ये  प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षनेते असलेले मोहम्मद आसिफ शरीफ आता सत्ताधारी झाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेत विरोधी कोण अन्‌ सत्ताधारी कोण हेच कळेनासे झाल्याने नगरसेवकांसोबत शहरवासीय सुद्धा पेचात आहेत.

पाच वर्षांपूर्वी भाजपची उमेदवारी मिळवून प्रियाताई बोंद्रे नगराध्यक्ष झाल्या. मागील आठवड्यात बोंद्रे दाम्पत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपने त्‍यांना व त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांना पक्षातून निष्काषित केले. त्यानंतर प्रिया बोंद्रे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप सिद्ध करण्याचे आव्हान भाजपला दिले. २८ ऑक्टोबर रोजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत बोंद्रे दाम्पत्याने काँग्रेसमध्ये प्रवेशही घेतला. भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले गोपाल देव्हडे यांनीही काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे पूर्वी भाजपच्या असलेल्या नगराध्यक्षा आता काँग्रेसच्या झाल्या.

काँग्रेसच्या पाठिंब्यावर पाणीपुरवठा सभापती झालेले गोपाल देव्हडे काँग्रेसचे सभापती झाले. उर्वरित विषय समित्यांच्या सभापतींपदासह १२ नगरसेवक सध्या भाजपकडे आहे. २ स्वीकृत नगरसेवकही भाजपकडे आहेत. २६ सदस्य संख्या असलेल्या नगरपरिषेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या मोहम्मद आसिफ शरीफ यांच्याकडे आहे. त्यामुळे विरोध कशाला करायचा अन्‌ करायचा तो तर तो कुणी करायचा, या संभ्रमात नगरसेवक आहेत. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासाच्या कामांवर मते मागणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यासुद्धा पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या आधारावर निवडणुकीच्या मैदानात  उतरणार असल्याने त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे चिखलीच्या नगरपालिकेत कोण विरोधी पक्ष आणि कोण सत्ताधारी, असा अजब प्रश्न निर्माण झाला आहे.