रोह्यांमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी! वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार! हिवरा गडलिंगच्या महिला सरपंचांचा इशारा..!

 
iugui
सिंदखेराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन्यप्राणी रोह्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली..हिरवे स्वप्न बघितले, मात्र रोह्यांमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या जात आहे. मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले पाहिजेत असा रोखठोक पवित्रा हिवरागडलिंग च्या सरपंच सौ. पूनम अनंता खरात यांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानीला अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटे सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत असा आरोप पूनम खरात यांनी केला. हिवरा गडलिंग येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पीक रोह्यांनी फस्त केले. वनविभागाचे अधिकारी बांधावर येऊन पंचनामे करायला तयार नाहीत. काही शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही त्यांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरवून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सरपंच पूनम खरात यांनी दिला. निवेदनावर गावातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.