जिल्ह्यातील ६५ गावांत पाणी पेटले!; तहान भागवण्यासाठी टँकर, अधिग्रहित विहिरी!!

 
45
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सूर्य आग ओकू लागला असून, एप्रिल अखेरीस जिल्ह्यातील ६५ गावांत पाणीटंचाईने पेट घेतला आहे. या गावांतील लाखावर गावकऱ्यांना तहान भागविण्यासाठी टँकर, अधिग्रहित विहिरीद्वारे करण्यात येणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे मेमध्ये पाणीसमस्या आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी यंदा पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. एप्रिल अखेरीस तब्बल ६५ गावांत पाणी पेटले आहे. कायम टंचाईग्रस्त असलेल्या ढासाळवाडी, हनवतखेड, वरवंड, पिंपरखेड (ता. बुलडाणा), असोला तांडा, असोला बुद्रूक( चिखली) या गावांत सध्या ६  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  एका टँकरद्वारे होणारा हा पुरवठा अपुरा पडत आहे. यामुळे ८ हजार ४४३ गावकऱ्यांचे बेहाल होत आहे.

याशिवाय जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ५९ गावांना ६० अधिग्रहित खासगी विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. यात देवपूर, पांगरी, पाडली, पोखरी, पिंपळगाव सराई, वरवंड, पिपरखेड, हनवत खेड, ढासाळवाडी (ता. बुलडाणा), भिवगाव बुद्रूक, सेवानगर (ता. देऊळगाव राजा)  तपोवन, सारोळा पिर (ता. मोताळा), असोला, हातनी, वैरागड, रानअंत्री, आमखेड, पेठ, डासाळा, दिवठाना, किन्ही सवडद, पळसखेड जयंती, वळती, खोर, हरणी, असोला तांडा (ता. चिखली), कुरखेड, जानोरी (ता. शेगाव), खंडाळा, नारखेड, हिंगणा बोटा (ता. नांदुरा), शेंदला, पांगरखेड, खुदनापूर, मादनी, मोहना खुर्द, आंदरूड, सुळा, सोनाटी, निंबा, बरडा, परतापूर, गणपूर, विश्वी, बोरी, उसरण (ता. मेहकर), पळसखेड, धायफळ, खारपकेंड लाड, देवानगर, वसंतनगर, बागुलखेड, अजीसपूर, अंजनी खुर्द, देऊळगाव कुंडपाळ (ता. लोणार), हरणखेड (ता. मलकापूर), चालथान, गारोळ (ता. जळगाव जामोद) या गावांचा समावेश आहे. या गावांत तीव्र पाणीटंचाईमुळे लाखावर ग्रामस्थांचे बेहाल होत असून, त्यांना हाती आलेल्या पाण्यावर आपली तहान व गरजा भागविणे भाग पडत आहे.