मोटारसायकल चोरायच्या अन् विकायचा हाच होता धंदा त्यांचा! चोरणारा पकडलाच विकत घेणारेही अडकले; LCB ची कारवाई

 
6898
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या  गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटार सायकल चोरीच्या ७ गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना बुलडाणा एलसीबीने गजाआड केले असून चोरीच्या मोटार सायकल विकत घेणाऱ्यांविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आज, १८ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

पीयूष धनराज इंगोले (२०, रा बुलडाणा ) असे मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांकडून त्यांनी चोरल्याल्या ६ सिबी शाईन मोटारसायकली, १ युनिकॉर्न व गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या २ मोटारसायकली अशा एकूण ९ मोटारसायकली , २ मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली शहरात गस्त सुरू असतांना एक  विनानंबरची मोटारसायकल पोलिसांना दिसून आली होती. त्या मोटारसायकल चालकाच्या चौकशीअंती हा गुन्हा उघडकीस आला आहे.
    
चोरीची मोटारसायकल विकत घेणे भोवले!
   चोरीची मोटारसायकल कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता विकत घेणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रणव प्रदिप डुकरे (१८, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली) , ऋषीकेश संतोष शिंगणे ( १८), सचिन संजय शेळके (२६) , गणेश गजानन डीगे (२१), ताराचंद प्रकाशचंद पारीख (५५),  नितीन शिवाजी शिंगणे (२५,  सर्व  रा. देऊळगावमही) व अभिषेक संजय देशमाने (२१, रा.रायपूर ता. बुलडाणा) अशी चोरीच्या मोटारसायकली विकत घेणाऱ्यांची नावे आहेत.जुन्या मोटारसायकली विकत घेतांना  योग्य ती कागदपत्रे तपासून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच वाहने खरेदी करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे  सपोनि अमित वानखेडे, सपोनि मनिष गावंडे, पोलीस अंमलदार  शेख साजीद, ओमप्रकाश सावळे,  श्रीकृष्ण चांदूरकर, गणेश किनगे, राहुल बॉर्डे, अमोल शेजोळ, गणेश पुरुषोत्तम पाटील यांनी पार पाडली.