प्लॉट विकून शेती घेतली... संपत्ती माझ्या वडिलांची!; आमदार संजय गायकवाड यांचा खुलासा

म्हणाले, मला वेळोवेळी जीवे मारण्याच्या धमक्या!! नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीशी युतीचे संकेत, पण काँग्रेसला ठेवणार दूर
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार झाल्यापासून माझ्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र  मी स्वतः आयुष्यात काही संपत्ती कमावली नाही. जे काही आहे ते माझ्या वडिलांचे आहे. ८३ प्लॉट माझ्या नावावर त्यांनी करून दिले होते. त्यातील ९ प्लॉट विकून मी शेती घेतली. मोताळा नगरपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांकडे पैसे नव्हते म्हणून पुन्हा २ प्लॉट विकले. माझी शेती आधी जंगलात होती. आता शहराचा विस्तार झाल्याने गाव जंगलात गेल्याने जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत, असा खुलासा आमदार संजय गायकवाड यांनी केला.

पहा व्हिडिओ ः

बुलडाणा येथील आयटीआय कॉलेजच्या प्रांगणात कार्यकर्ता - मित्र  - परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन शिवसेनेतर्फे आज, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी करण्यात आले होते. त्‍यावेळी ते बोलत होते. मंचावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, नरेंद्र खेडेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार गायकवाड यांनी आमदार काळात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला.

67

कोरोनाच्या १८ महिन्यांच्या काळात आणि शासन स्थापनेच्या ३ महिन्यांच्या काळात एक आमदार काय काय करू शकतो हे दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे ते या वेळी म्हणाले. माझ्या घरासमोर गाडीचा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न झाला. वेळोवेळी मला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मात्र हिजडे धंदे बंद करा. तुमचे मनसुबे शिवसैनिक   उधळून लावतील, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. शिवसेना आधी संघटना होती. मात्र आता राजकीय पक्ष आहे.

भाजप स्वतःचा पक्ष वाढविण्यावर भर देत आहे. आता शिवसैनिकांनीसुद्धा पक्ष वाढविण्यासाठी मैदानात उतरणे आवश्यक आहे. बदलत्या राजकारणाचा स्वीकार केला पाहिजे. मुस्लिम मतदारांना दूर्लक्षित करून चालणार नाही. मोताळा नगरपंचायत निवडणुकीत ५ मुस्लिम उमेदवारांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मुस्लिमांनी भगवा स्वीकारला. आता आपण बदलते राजकारण स्वीकारले पाहिजे. आणखी एखादी जागा मोताळा येथे जिंकू शकलो असतो तर नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला असता, असे आमदार गायकवाड म्हणाले.

...अन्यथा नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढू!
कोरोना संकटकाळात बुलडाण्यात शिवसेनेने प्रचंड काम केले आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाऐवजी आम्ही १०० टक्के समाजकारण केले. बुलडाणा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. २२ पुतळे उभारण्याचे काम शहरात सुरू आहे. विकासकामांच्या भरवशावर आम्ही लोकांपुढे मत मागण्यासाठी जाणार आहोत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांवर शिवेसेनेचा भगवा फडकवणार असल्याचे ते म्हणाले.

बुलडाणा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीची बोलणी करू. सन्मानजनक तोडगा निघाला तर ठीक नाहीतर स्वबळावर नगरपरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी वेगळे लढू, असे आमदार गायकवाड म्हणाले. यावेळी त्यांनी महविकास आघाडीतील काँग्रेसचा उल्लेख टाळला. कार्यक्रमानंतर बुलडाणा लाइव्हने त्यांना याबद्दल छेडले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीशी युती संदर्भात आम्ही बोलणी करणार आहोत. मात्र काँग्रेसशी आम्ही बोलणार नाही. आम्हाला काँग्रेसशी युती करायची नाही, असे ते म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे बुलडाण्यातील महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्याचे चित्र आहे.

संबंधित बातमी ः

काही जण आयुष्यभर नावामागे "माजी' लावण्यासाठी पदे घेतात!; खासदार जाधव यांच्या शिवसैनिकांना कानपिचक्‍या!!