बुलडाण्यात मोबाइलच्या प्रकाशात पार पडले "ऑपरेशन कोब्रा'! "श्रीराम'मुळे टळला धोका!!

 
5646
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लोडशेडिंगमुळे घरची वीज गेली. या वेळी बागडणारी मुले अगोदरच भयभीत असतानाच अचानक प्रकट झालेल्या नागराजामुळे घरात एकच कल्लोळ उडाला! नागाला मारावं की मुलांना सुखरूप बाहेर काढावे असा गंभीर प्रश्न त्या कुटुंबासमोर पडलेला असतानाच तिथे पोहोचलेल्या श्रीरामने झटपट या प्रश्नांची उत्तरे देत सर्वांनाच भयमुक्त केले.

बुलडाणा- अजिंठा मार्गावरील धाड नाका परिसरातील राजपूत ले आऊटमध्ये काल, २१ मार्चला रात्री  हा थरार रंगला. तेथील रहिवासी कैलास पवार यांच्या निवासस्थानी महावितरणच्या (लोडशेडिंग) कृपेने अंधार दाटला होता. घरात लहान मुले खेळत असताना अचानक सळसळणाऱ्या कोब्राचे दर्शन झाले.

यामुळे अख्खे पवार कुटुंबीय हादरले! यातून प्रसंगावधान राखत संपर्क केल्यावर सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी जीवाचा धोका पत्करत कौशल्य व अनुभव पणाला लावून मोबाइलच्या प्रकाशात नागाला पकडून बरणीत बंद केले. यानंतरच पवार कंपनी आणि परिससवासियांनी सुटकेचा श्वास सोडला.