सिंदखेडराजात इतिहास सांगताना खासदार प्रतापराव जाधव चुकले! पुरंदरच्या तहाची दिली चुकीची माहिती! स्वतःला निष्ठावान म्हणवून घेणाऱ्यांना म्हणाले, तुमची काँग्रेस राष्ट्रवादीशी छुपी युती!

 
fg
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिंदेगटात सामील झाल्यानंतर बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांचे काल बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले. सायंकाळी सिंदखेडराजा येथे त्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सबोधित करतांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय कसा योग्य आहे हे पटवून दिले. शिवसेना वाचवण्यासाठी ही सगळी धडपड आहे हे सांगण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत केलेल्या तहाचा दाखला दिला. मात्र हे सांगत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. 

"मिर्झा राजे जयसिंगाने पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत तह केला. या तहात शिवाजी महाराजांनी आपले ३४ किल्ले मोगलांना दिले. आणि स्वतःच्या मुलाला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना ५ हजार रुपयांची मनसबदारी दिली." असे उदाहरण खासदार जाधवांनी दिले. मात्र शिवाजी महाराजांनी जेव्हा मिर्झा राजे जयसिंगासोबत हा तह केला होता तेव्हा स्वराज्यातील ३४ नव्हे तर २३ किल्ले दिलेले होते. शिवाय युवराज छत्रपती संभाजी महाराजांना ५ हजार "रुपयांची" नव्हे तर ५ हजार सैनिकांची मनसबदारी दिली होती. मनसबदारी ही पद्धत सैन्य संघटित करण्याची पद्धत होती त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी ५ हजार रुपयांची मनसबदारी स्वीकारली हा दावाही चुकीचा ठरतो.
   
स्वतःला निष्ठावान म्हणवून घेणाऱ्यांची काँग्रेस राष्ट्रवादीशी छूपी युती..
दरम्यान या सभेत खा. जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय कसा योग्य आहे हे पटवून दिले. त्यासाठी  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला जाहीरनामा काय होता याची आठवण त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती असणारी चांडाळ चौकडी त्यांना चुकीचे मार्गदर्शन करीत होती. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाचा पालकमंत्री असे ठरलेले असताना एक आमदार असताना जिल्ह्यात राष्ट्रवादीला पालकमंत्री पद दिल्या गेले.  हे डोक पवार साहेबांच होत. जिथे जिथे शिवसेनेच्या खासदाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला तिथे तिथे राष्ट्रवादीला पालकमंत्री पद दिल्या गेले.

बुलडाणा जिल्ह्यात मी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत होतो असा आरोप खा. जाधवांनी यावेळी केला. ५५ पैकी ४० आमदार सोडून जातात,१८ पैकी १२ खासदार सोडून जातात..का जात असतील? आम्ही का मूर्ख आहोत का असा सवालही खा. जाधव यांनी यावेळी केला. मी एकदाही शिवसेनेकडे उमेदवारीसाठी अर्ज केला नाही, मुलाखत दिली नाही   असेही खा. जाधव यावेळी म्हणाले. जे स्वतःला निष्ठावान शिवसैनिक म्हणुन घेत आमच्यावर टीका करीत आहेत त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी छुपी युती आहे असा घणाघात खा. जाधवांनी यावेळी केला.