GOOD NEWS; आपल्या माणसाचा डंका! आपल्या महाराष्ट्र अर्बन को - ऑप बँक फेडरेशन लि. मुंबईच्या संचालकपदी सतीश गुप्त विजयी! म्हणाले, विश्वास सार्थ ठरविणार..!

 
gupta
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   महाराष्ट्र अर्बन को - ऑप बँक फेडरेशन लि. मुंबईची निवडणूक १२ नोव्हेंबरला पार पडली. १४ नोव्हेंबरला लागलेल्या निकालात संचालकपदी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी विजय मिळवला आहे. विदर्भातून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारानेही त्यांना मतदान केले. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा होता,मात्र तांत्रिक अडचणीमुळे तो अर्ज कायम राहिला होता. सतीश गुप्त यांच्या विजयामुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवणे तसेच त्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम महाराष्ट्र अर्बन को - ऑप बँक फेडरेशन करीत आहे. विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त २०१५ पासून या फेडरेशन च्या माध्यमातून संचालकाची भूमिका पार पाडत आपला सहभाग मोठ्या हिरारीने नोंदवत आहे. दरम्यान २०२२ ते २०२७ या कार्यकाळासाठी नुकतीच निवडणूक पार पडली.सतीश गुप्त यांनी गत कार्यकाळात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना विदर्भातून एकमुखाने संचालकपदी अविरोध करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज कायम राहिल्याने मतदान झाले. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराने देखील सतीश गुप्त यांना मतदान करून सहकार्य केले. त्यामुळे १४ नोव्हेंबरला लागलेला निकाल अपेक्षित असाच होता. पहिल्या कार्यकाळात सतीश गुप्त यांनी संचालक आणि रिझर्व बँकेच्या नागपूर कार्यालयात टॅफ कब  समितीचे सदस्य अशी दुहेरी जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत अनेक नागरी सहकारी बँकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.

  विश्वास सार्थ ठरविणार: सतीश गुप्त

 या निवडणुकीत दुसऱ्यांदा मला विजयी करणाऱ्या विदर्भातील सर्व बँकाचे विविध प्रश्न, अडचणी रिझर्व बँकेकडे मांडून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. अजानतेपणी झालेल्या चुका परत घडू नये यासाठी बँकेच्या कर्मचारी तथा संचालक मंडळाला प्रशिक्षण दिले जाईल. त्रासात असलेल्या बँकांची बाजू रिझर्व बँकेकडे मांडून त्यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सतीश गुप्त यांनी विजयानंतर म्हटले आहे.