स्वदेस है मेरा… चिखलीच्‍या कोविड सेंटरसाठी चीनमधून अभियंत्‍याने पाठवली मदत; कोलाऱ्याच्‍या सुपूत्राचे औदार्य

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगात कुठेही असले तरी मायभूमीची ओढ अन् प्रेम काही कमी होत नसते. कोलाऱ्याचे (ता. चिखली) नामदेव गायकवाड चीनच्या शांघाय शहरात अभियंता आहेत. कोरोनाचा प्रकाेप भारतात सुरू असताना, आपल्या देशबांधवांसाठी खास करून जन्मभूमीसाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटत होते. ही संधी त्यांना मिळाली, मग त्यांनी वेळ न दवडता तातडीने दोन ऑक्सिजन …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जगात कुठेही असले तरी मायभूमीची ओढ अन्‌ प्रेम काही कमी होत नसते. कोलाऱ्याचे (ता. चिखली) नामदेव गायकवाड चीनच्‍या शांघाय शहरात अभियंता आहेत. कोरोनाचा प्रकाेप भारतात सुरू असताना, आपल्या देशबांधवांसाठी खास करून जन्‍मभूमीसाठी काहीतरी करावे, असे त्‍यांना वाटत होते. ही संधी त्‍यांना मिळाली, मग त्‍यांनी वेळ न दवडता तातडीने दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर चिखलीच्‍या कर्मयोगी कोविड सेंटरला मदत म्‍हणून दान केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे नामदेव गायकवाड यांनी ऐकले आणि त्‍यांचे मन कासावीस झाले. विमान सेवा बंद असल्यामुळे भारतात परत येता येत नव्हते. कर्मयोगी कोविड सेंटरच्‍या प्राणवायू प्रकल्पाची माहिती सोशल मीडियाच्‍या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचली. संकटात असलेल्या आपल्या लोकांना मदत करण्याची भावना त्यांच्यात जागृत झाली. त्यांनी स्वतःच्या कुटूंबियांसाठी विकत घेतलेले दोन आॅक्सिजन कॉन्सेंट्रेटर कर्मयोगी कोविड सेंटरला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. तातडीने ते दोन आॅक्सीजन कॉन्सेंट्रेटर भारतात रवानासुध्दा केले. नामदेव गायकवाडचे वडील कोलारा गावचे माजी सरपंच असून, ते त्यांच्या दोन मुलांसमवेत कॉन्सेंट्रेटर घेऊन चिखलीत दाखल झाले होते. यावेळी हातणी येथील राम जाधव, कोलारा येथील बिदुसिंग इंगळे, गौतम मघाडे, शिवशंकर सोळंकी, समाधान सोळंकी, विश्वनाथ सोळंकी, रामेश्वर सोळंकी यांची उपस्थिती होती.