साथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्‍यांच्‍या यंत्रणेने!; आज आरोग्‍य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्‍णांची तपासणी

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावात तापेची साथ पसरलेली असताना आणि रोज नवीन रुग्णांची भर पडत असताना ज्यांचे हे हिवरा खुर्द गाव आहे त्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषा पवार यांच्यासह त्यांच्या आरोग्य यंत्रणेनेही दूर्लक्ष केले. परिणामी अवघे गाव या साथीच्या दाढेत गेले असून, आज, २३ जुलैला या बद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्याने …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावात तापेची साथ पसरलेली असताना आणि रोज नवीन रुग्‍णांची भर पडत असताना ज्‍यांचे हे हिवरा खुर्द गाव आहे त्‍या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषा पवार यांच्‍यासह त्‍यांच्‍या आरोग्‍य यंत्रणेनेही दूर्लक्ष केले. परिणामी अवघे गाव या साथीच्‍या दाढेत गेले असून, आज, २३ जुलैला या बद्दल बातम्‍या प्रसिद्ध झाल्याने जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्‍या आरोग्‍य यंत्रणेने गाव गाठले आणि नागरिकांची आरोग्‍य तपासणी केली. सध्या गावात आरोग्‍य पथक तैनात असून, उपाययोजना केल्या आहेत. डेंग्‍यूसदृश्य तापेच्या २८ रुग्‍णांची तपासणी करण्यात आली. पैकी १० रुग्‍ण तापेचे निघाले. यात दोन रुग्‍ण डेंग्‍यूचे निघाल्याने वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. विशेष म्‍हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षांचे हे गाव असूनही, गावात साथ पसरेपर्यंत अध्यक्षांना कळले कसे नाही, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

साथ पसरण्याचे खापर ग्रामपंचायतीवर फोडले जात आहे. गाव स्वच्छ ठेवणे, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे, विहिरींत ब्लिचिंग पावडर टाकणे, नाल्या काढणे, खड्डे बुजवणे या उपाययोजनांत ग्रामपंचायत कमी पडली आहे, असे म्‍हणावे लागेल. गावात रुग्‍ण आढळू लागले तेव्‍हा आरोग्‍य विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्‍यामुळे रुग्‍ण संख्या वाढत गेली. अनेक रुग्‍णांना बुलडाणा व औरंगाबादला हलवावे लागले. अाज आरोग्‍य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्‍यांनी जिल्हा परिषद शाळेत २८ रुग्णांची तपासणी केली. त्यात दहा रुग्ण तापेचे आढळल्याने त्यांच्‍या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली. डेंगूसदृश्य असणाऱ्या ६ रुग्णांना भेटी देऊन तपासणी केली असता त्‍यात २ रुग्ण डेंग्‍यूचे आढळल्‍याचे जानेफळ वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले. हिवरा खुर्दमध्ये डेंगू सदृश्य आजाराने थैमान घातल्‍याने आता तरी जिल्हा परिषद अध्यक्षांनी लक्ष घालून उपचार व निदानासाठी आरोग्य विभागाची टीम कायमस्वरुपी नियुक्त करावी. डेंगू सदृश्य आजाराला कारणीभूत असणाऱ्या आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आरोग्‍य विभागाच्‍या पथकात डॉ. स्वप्नील चव्हाण, डॉ. सूरज ठाकरे, डॉ. स्नेहा गडाख, बबन काकडे, श्रीमती दाभाडे, श्रीमती जेऊघाले, श्रीमती गावंडे, धनंजय जाधव, गजानन अवचार, श्रीमती दखोरे, श्रीमती इंगोले, श्रीमती दांडगे आदींचा समावेश होता. त्‍यांना आशासेविका, सरपंच, ग्रामंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.