शेतकऱ्यांनो नका करू पेरणीची घाई; जिल्ह्यात अजूनही सार्वत्रिक पाऊस नाई…! ७ तालुक्यांत नगण्य वर्षाव!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अवघ्या तीन-चार तालुक्यांत पेरणीयोग्य पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी त्या तालुक्यांतील काही महसूल मंडळांमध्येही समाधानकारक पाऊस नाही. जिल्ह्यातील ८ तालुक्यांत नगण्य पाऊस झाला आहे तर काही तालुक्यांत सुरुवातीला बरसलेला पाऊस मात्र …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्‍यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अवघ्या तीन-चार तालुक्यांत पेरणीयोग्य पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी त्या तालुक्यांतील काही महसूल मंडळांमध्येही समाधानकारक पाऊस नाही. जिल्ह्यातील ८ तालुक्यांत नगण्य पाऊस झाला आहे तर काही तालुक्यांत सुरुवातीला बरसलेला पाऊस मात्र आता रुसलेला आहे. त्यामुळे आधीच पीककर्ज आणि खते, बियाणामुळे कोंडीत सापडलेला बळीराजा पाऊस लांबल्यामुळे हवालदिल झाला आहे.

गेल्या वर्षी पीक काढणीपर्यंत धो धो बरसणारा पाऊस यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच रुसला आहे. शासकीय आकडेवारीनुसार बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ९९०१ मि.मी. पाऊस (७१.६६ टक्के) पाऊस पडतो. पैकी १५ जूनपर्यंत ७५५ मि. मी. इतका पाऊस झाला असून, त्याची टक्केवारी ७.६३ टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत १२३८ मि. मि. इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा झालेल्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.

जिल्ह्यात १५ जूनपर्यंत पडलेला पाऊस (आकडे मि.मी.मध्ये)

 • बुलडाणा ः ०२.३
 • चिखली ः १०७
 • देऊळगाव राजा ः ४२.१
 • सिंदखेडराजा ः ९१.७
 • लोणार ः ५६.०७
 • मेहकर ः १२७.३
 • खामगाव ः ८०.१
 • शेगाव : ०७.१
 • मलकापूर ः २४
 • नांदुरा ः ४१.४
 • मोताळा ः २८.१
 • संग्रामपूर ः ९०.२
 • जळगाव जामोद ः १७.६
 • जिल्ह्यात एकूण पाऊस : ७५५.६ मि.मी., ०७.६३ टक्के

आठ तालुक्यांत पावसाची प्रतीक्षाच
बुलडाणा, मोताळा, देऊळगाव राजा, लोणार, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर या आठ तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे तर चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, संग्रामपूर या भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.

८० ते १०० मि.मी. पाऊस पडेपर्यंत नका करू पेरणी
८० ते १०० मि.मी. पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास व पावसात खंड पडल्यास बियाणे वाया जाऊ शकते. सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे कृषी हवामान केंद्र बुलडाणाचे मनेष यदुलवार यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.