‘बुलडाणा लाइव्‍ह’चा १ ला वर्धापन दिन 14 मे रोजी! ‘व्हिजन बुलडाणा’ विशेषांक मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मुंबईत होणार प्रसिद्ध; राधेश्याम चांडक, सौ. आरती पालवे यांना ‘बुलडाणा लाइव्‍ह सन्‍मान’ने गौरवणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातील पहिली लोकल न्यूज वेबसाईट असलेल्या बुलडाणा लाइव्हला सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. येत्या 14 मे रोजी तिथीनुसार अक्षयतृतीयेला बुलडाणा लाइव्हचा पहिला वर्धापन दिन आहे. यानिमित्त बुलडाणा लाइव्हतर्फे ‘व्हिजन बुलडाणा’ हा विशेषांक कॉफी टेबल बुकरुपी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या माध्यमातून बुलडाण्याच्या विकासाचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातील पहिली लोकल न्‍यूज वेबसाईट असलेल्या बुलडाणा लाइव्‍हला सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. येत्‍या 14 मे रोजी तिथीनुसार अक्षयतृतीयेला बुलडाणा लाइव्‍हचा पहिला वर्धापन दिन आहे. यानिमित्त बुलडाणा लाइव्‍हतर्फे ‘व्‍हिजन बुलडाणा’ हा विशेषांक कॉफी टेबल बुकरुपी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या माध्यमातून बुलडाण्याच्‍या विकासाचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले जाणार असून, त्‍यांच्‍याच हस्‍ते या बुकचे प्रकाशन मुंबईत केले जाणार आहे. याच दिवशी बुलडाणा लाइव्‍ह सन्‍मानही दोन खास व्‍यक्‍तींना दिला जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्याच्‍या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असणारे बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि बेवारस, बेघर, दिव्‍यांग, मनोरुग्‍णांसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सौ. आरतीताई नंदकुमार पालवे (अध्यक्षा सेवासंकल्प प्रतिष्ठान, पळसखेड सपकाळ, ता. चिखली) यांची निवड पहिल्या वर्षीच्‍या सन्‍मानासाठी बुलडाणा लाइव्‍हने केली आहे, अशी माहिती लाइव्‍ह ग्रुपचे समूह सल्लागार तथा बुलडाणा लाइव्‍हचे संचालक मनोज सांगळे यांनी दिली.

गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला (24 एप्रिल) बुलडाणा लाइव्‍हची सुरुवात झाली. कोरोनाच्‍या काळात सत्‍य माहिती पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम त्‍याकाळात बुलडाणा लाइव्‍हने केले. त्‍यामुळे अफवांचा बाजार कमी झाला. वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांच्‍या हवाल्याने कोरोनाविषयक सत्‍य माहिती वेळोवेळी वाचकांपर्यंत पोहोचत गेल्याने वाचकांचाही बुलडाणा लाइव्‍हवर विश्वास बसला, तोच विश्वास आजतागायत कायम आहे. वर्षभरात बुलडाणा लाइव्‍हने अनेकांना न्याय मिळवून दिला. अनेक सामाजिक उपक्रमांच्‍या माध्यमातून वाचकांच्‍या हृदयात स्‍थान मिळवले. नेत्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्त बुलडाणा लाइव्‍हने प्रसिद्ध केलेल्या पुरवण्यांची तर विशेष चर्चा झाली. बुलडाणा लाइव्‍हने काढलेल्या दिवाळी अंकाचेही अनेकांनी कौतुक केले. पहिलाच अंक असूनही साहित्‍य आणि करिअर- व्‍यवसाय घडविण्यासाठी उपयुक्‍त ठरणाऱ्या लेखांमुळे या अंकाला चांगली मागणी राहिली. संपादक संजय मोहिते, जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांच्‍या नेतृत्त्वाखाली बुलडाणा लाइव्‍हची 34 जणांची टीम सध्या जिल्ह्यात कार्यरत आहे.

बुलडाण्यातील काहीशे वाचक मिळवून सुरू झालेला हा प्रवास सध्या 1,25,000 ते 1,50,000 वाचकसंख्येवर येऊन ठेपला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वस्‍तरातील नागरिक बुलडाणा लाइव्‍हशी जोडले गेलेलेच आहेत, पण मूळचे बुलडाण्याचे मात्र व्‍यवसाय- नोकरीनिमित्त परशहरात, परराज्‍यात आणि विदेशात स्‍थायिक झालेल्या बुलडाणेकरांनाही आपल्या जिल्ह्याविषयी सतत अपडेट ठेवण्याचे काम बुलडाणा लाइव्‍हने केले. याच वाचकसंख्येमुळे बुलडाणा लाइव्‍हला स्‍थानिक जाहिरातींचा ओघही मोठा आहे. याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्‍थांनाही बुलडाणा लाइव्‍हने भुरळ घातल्याने गुगल ॲडसेन्‍स, एम गिड, ॲडझेब्रासारख्या संस्‍थांनी बुलडाणा लाइव्‍हशी करार केला आहे.

काय असेल ‘व्हिजन बुलडाणा’…

जिल्ह्यातील आमदार, खासदारांसह प्रमुख लोकप्रतिनिधींच्‍या मुलाखती, त्‍यांचे विकासाचे व्हिजन या बुकमध्ये असेल. मान्यवरांचे जिल्ह्याच्‍या विकासाच्‍या अनुषंगाने लेखही त्‍यात आहेत. हा सारा गोषवारा एक साकडे म्‍हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच जिल्ह्यात राबवला जातोय, हे विशेष.

घरी जाऊन करणार त्‍यांचा गौरव…

सध्या कोरोनाचा काळ असल्याने कोणता मोठा कार्यक्रम न घेता बुलडाणा लाइव्‍हतर्फे बुलडाणा लाइव्‍ह सन्‍मान हा पुरस्‍कार बुलडाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि सेवासंकल्प प्रतिष्ठानच्‍या अध्यक्षा सौ. आरतीताई पालवे यांना घरी जाऊन प्रदान करण्यात येणार आहे. स्‍मृतीचिन्‍ह, सन्‍मानपत्र, शाल-श्रीफळ असे पुरस्‍काराचे स्‍वरुप असेल.