…तर दुबार पेरणीचे संकट निश्चित!; दुसरीकडे बियाणे तुटवड्याचे संकट

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मृग नक्षत्राच्या सुरुवातीला हजेरी लावलेल्या पावसाने नंतर दांडी मारली. काही मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नाही ते शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. जिल्ह्यात मेहकर, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मृग नक्षत्राच्या सुरुवातीला हजेरी लावलेल्या पावसाने नंतर दांडी मारली. काही मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नाही ते शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत.

जिल्ह्यात मेहकर, लोणार, चिखली, खामगाव, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. मात्र या भागातूनही आता पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार यावर्षी जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी होणार आहे. त्यासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात येत असले तरी वास्‍तव काही वेगळेच आहे. शेतकऱ्यांकडून साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल विकत घेतले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांना बियाण्याच्या स्वरूपात 10 ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने घ्यावे लागत आहे. बियाणांचा तुटवडा असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगितले जाते व अधिकच्या दरात शेतकऱ्यांना बियाणे विकले जात असल्याची प्रतिक्रिया केळवद (ता. चिखली) येथील शेतकरी भुजंगराव बोरबळे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. बोरबळे यांची केळवद शिवारात 18 एकर शेती आहे. अजून पेरणी केलेली नाही. परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांनाही जर दोन ते तीन दिवसांत पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करावी लागू शकते असे ते म्हणाले. पहिल्यांदाच पेरणी करायला बियाण्याची जुळवाजुळव करावी लागत असेल तर दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खते आणायची कुठून याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.

29 जूनपर्यंत तुरळकच…
जिल्ह्यात 29 जूनपर्यंत तरी सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही. ज्यांनी पेरणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी योग्य ओल बघूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे मनीष येदुलवार यांनी बुलडाणा लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.

पुढील लिंकवर क्लिक करून पहा व्हिडिओ ः https://youtu.be/DQJlYQqckvg