गैरव्यवहार, घोटाळ्यांच्या आरोपांनी चिखली नगरपरिषद वादात!; चौकशी समितीच्‍या पाहणीतही धक्‍कादायक बाबी समोर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सत्ताधारी आणि प्रशासनावर गैरव्यवहार आणि घोटाळ्याचे आरोप झाल्याने चिखली नगरपरिषद सध्या वादात सापडलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या गैरव्यवहारांची तक्रार केली होती. त्यासाठी आंदोलनेही केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत, नगरपरिषदेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करायचा आहे, मात्र समितीच्या चौकशीतूनही आरोपांत तथ्य असल्याचे दिसून येत …
 
गैरव्यवहार, घोटाळ्यांच्या आरोपांनी चिखली नगरपरिषद वादात!; चौकशी समितीच्‍या पाहणीतही धक्‍कादायक बाबी समोर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सत्ताधारी आणि प्रशासनावर गैरव्यवहार आणि घोटाळ्याचे आरोप झाल्याने चिखली नगरपरिषद सध्या वादात सापडलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या गैरव्यवहारांची तक्रार केली होती. त्‍यासाठी आंदोलनेही केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत, नगरपरिषदेच्‍या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करायचा आहे, मात्र समितीच्‍या चौकशीतूनही आरोपांत तथ्य असल्याचे दिसून येत असल्याने, संभाव्‍य चौकशी आणि कारवाईच्‍या शक्‍यतेने सत्ताधारी, अधिकारी हादरले आहेत. दुसरीकडे नगरपरिषद चौकशी समितीला कागदपत्रे देण्यासही टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. त्‍यामुळे ही चौकशी किती पारदर्शीपणे होईल यावर संशय व्‍यक्‍त होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लाइव्‍हला चिखली नगरपरिषदेवर होणाऱ्या आरोपांबद्दल सांगितले, की करोडो रुपयांचा घोटाळा झालेला आहे. वर्षभरापूर्वीच ज्या कामांची पूर्ण बिले काढली ती कामे अर्धवट आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तक्रार केली म्हणून चौकशीच्‍या भितीने रात्रीतून काही कामे थातूरमातूर केली जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीला कागदपत्रे देण्यासही नगरपरिषद टाळाटाळ करत आहे. आता या प्रकरणात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असे श्री. तुपकर म्‍हणाले. “स्वाभिमानी’चे मयूर बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगर परिषदेच्‍या गैरव्यवहारांची तक्रार केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी टॉवरवर चढून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर तहसीलदार अजितकुमार येळे यांच्या नेतृत्वात एक त्रिसदस्यीय समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणात आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

व्यायामशाळा गेली कुठे?
चिखली नगरपरिषेकडून बाबू लॉज चौकात 74 लक्ष रुपये खर्चून व्यायामशाळा बांधल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी व्यायामशाळा नसून शादिखाना आहे. शादिखान्याची इमारतसुद्धा एका ट्रस्टच्या मालकीची आहे. चौकशी समितीने पाहणी केली असता त्यांनाही व्यायामशाळा दिसून आली नसल्याचे व तसा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चिखली शहरात चक्क व्यायामशाळाच चोरीला गेल्याची चर्चा आहे.

तरीही सत्ताधारी म्‍हणतात, आमचा कारभार निर्मळ…!
चौकशी समितीच्‍या पाहणीत आणि चौकशीत धक्‍कादायक खुलासे होत असताना, दुसरीकडे सत्ताधारी मात्र आमचा कारभार निर्मळ असे म्‍हणत आहेत. नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले, की चिखली नगरपरिषदेत गेल्या चार वर्षांत करोडो रुपयांची विकासकामे झाली आहेत. चिखली शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आपल्या कारकिर्दीत झाले. रस्ते, नाल्या, पाणी, वीज, नगरपरिषद हद्द असे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा दावा करून त्‍यांनी नगरपरिषदेवर होणाऱ्या आरोपांचे खापर विरोधकांवर फोडले आहे. विरोधकांच्‍या पोटात दुखत असल्‍याने सर्व आरोप हेतुपुरस्सर व राजकीय हेतूने प्रेरित आहेत. रहिवाशांनी आरोप केलेले नसून आरोप करणारे हे बाहेरचे लोक आहेत. अधिकाऱ्यांना काम न करू देणे ही आरोप करणाऱ्यांची संस्कृती आहे. आम्ही व आमचे सर्व नगरसेवक अधिकाऱ्यांच्या पाठिशी आहोत. आमचा कारभार अतिशय पारदर्शी आणि निर्मळ आहे. एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही. कामामध्ये थोडाफार बदल हा स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी दिली.

चौकशी व्‍हावी पारदर्शी…
चिखली नगरपरिषदेने केलेल्‍या विकासकामांवर आरोप नवे नाहीत. मात्र सध्या मोठ्या गैरव्यवहाराची चर्चा सुरू असल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी पारदर्शी आणि कोणाच्‍याही दबावाखाली होऊ नये, अशी अपेक्षा चिखलीकरांना आहे. दुसरीकडे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस मात्र महिनाभरापासून रजेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्‍यामुळे त्‍यांचा प्रभारी कारभार मेहकरच्‍या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्‍यामुळे संशयाचे वातावरण आणखीनच गडद झाले आहे.