आपल्या लाडक्‍यांना कोरोना होईल ही भीतीच निराधार; राज्‍याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. आवटे यांचा ‘Buldana Live’कडे निर्वाळा

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाच वर्षांखालील मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण गेल्या 6 महिन्यांत अवघे एक ते दीड टक्के आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्गाची भीती निराधार असून, त्याला शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्ट मत राज्याच्या आरोग्य विभागाचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी Buldana Live शी बोलताना व्यक्त केले. …
 

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाच वर्षांखालील मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण गेल्या 6 महिन्यांत अवघे एक ते दीड टक्‍के आहे. त्‍यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्गाची भीती निराधार असून, त्‍याला शास्‍त्रीय आधार नसल्याचे स्‍पष्ट मत राज्याच्या आरोग्य विभागाचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी Buldana Live शी बोलताना व्‍यक्‍त केले.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रामुख्याने लक्ष्य करणार असल्याचे अंदाज व्‍यक्‍त होत आहेत. त्‍यामुळे पालक घाबरले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. आवटे यांच्‍याशी Live ने संपर्क साधला असता ते म्‍हणाले, की कोरोना विषाणूला शरीरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट रिसेप्टर लहान मुलांमध्ये विकसित झालेले नसतात. त्यामुळे त्यांच्यात फार गंभीर आजार उद्‌भवताना दिसत नाहीत. मोठ्या माणसांप्रमाणेच मुलांनाही कोरोना होण्याची भीती असते; पण तिसऱ्या लाटेत मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे, असे डॉ. आवटे म्‍हणाले.

तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी ती कधी येईल, किती तीव्र असेल हे सांगणे कठीण आहे. ९० टक्के मुलांमधील कोरोना सौम्य स्वरुपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे. काही मुलांना अतिदक्षता विभागाची (आयसीयू) गरज भासू शकते. त्यांचे प्रमाण जास्त नाही आणि त्यासाठीच आपली तयारी सुरू असल्याचे ते म्‍हणाले. मे महिन्यात १८ वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.०७ टक्के आहे. म्हणजे साधारणतः १० हजार मुलांना संसर्ग झाला, तर त्यातील केवळ एका मुलाचा मृत्यू होतो. अतिजोखमीचे आजार असलेल्या मुलांमध्येच गुंतागुंतीची शक्यता अधिक असते. लहान मुलांत कोरोनाचे प्रमाण वाढू शकते, हे गृहित धरून तयारी करत आहोत, ही चांगली गोष्ट आहे; परंतु त्यामुळे पालकांच्या मनात भीती निर्माण होणे योग्य नाही, याकडे लक्ष देण्याची गरज डॉ. आवटे यांनी व्‍यक्‍त केली.