अयोद्ध्येतील श्रीराम मंदिरासाठी जिल्ह्यात निधी संकलन सुरू; चिखलीत कार्यालयाचेही उद्घाटन; अवघ्या काही मिनिटांत 1 लाख 92 हजार झाले जमा!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऐक्याची प्रेरणा आणि चालना देणारे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रीय नवनिर्माणाचा आरंभ ठरेल, असा ठाम विश्वास सिध्दलिंग शिवाचार्य स्वामी यांनी व्यक्त केला. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज, 5 जानेवारी रोजी करताना ते बोलत होते. कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगीच 1 लाख 92 हजारांचा निधी झाला …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऐक्याची प्रेरणा आणि चालना देणारे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रीय नवनिर्माणाचा आरंभ ठरेल, असा ठाम विश्‍वास सिध्दलिंग शिवाचार्य स्वामी यांनी व्यक्त केला. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज, 5 जानेवारी रोजी करताना ते बोलत होते. कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगीच 1 लाख 92 हजारांचा निधी झाला हे विशेष.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलडाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, भागवताचार्य साध्वी त्रिवेणीताई देशमुख व अभियानाचे जिल्हा संयोजक गजानन ठाकरे यांची मंचावर उपस्थिती होती. सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून कार्यालयाचे उद्घाटन व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. श्रीराम जन्मभूमीवरील संकल्पित मंदिरासाठी संपूर्ण देशात हे महाअभियान 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान चालवले जाणार आहे. यामध्ये देशातील 4 लाख गावांतील 17 कोटी कुटुंबांपर्यंत कार्यकर्ते पोहचणार आहेत. निधी संकलनाच्या निमित्ताने निश्‍चितच धर्म जागरण आणि राष्ट्र जागरण होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बुलडाणा जिल्ह्यात 8 तालुक्यातील 554 गावांमध्ये हे अभियान राबले जाणार असून, प्रत्येक रामभक्तापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन चित्तरंजन राठी यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील धीरज कथने यांच्या गणेश एजन्सीच्या इमारतीत हे कार्यालय सुरू झाले आहे. प्रास्ताविक जिल्हा संयोजक गजानन ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सहसंयोजक माधव धुंदळे यांनी केले. नगर संयोजक विलास श्रीवास्तव यांनी आभार मानले. विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.