…म्‍हणून कोरोना ड्युटीला शिक्षक वैतागले!; आपले गाऱ्हाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन लढणारे शिक्षक आता वैतागले आहेत. याला कारणे अनेक आहेत. या कारणांच्या सोडवणुकीसाठी शिक्षकांनी 9 प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना गाव पातळी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्‍य यंत्रणेच्‍या खांद्याला खांदा देऊन लढणारे शिक्षक आता वैतागले आहेत. याला कारणे अनेक आहेत. या कारणांच्‍या सोडवणुकीसाठी शिक्षकांनी 9 प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्‍हटले आहे, की जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्यावर नेमणुका दिल्या आहेत. शिक्षक सुध्दा आपले योगदान या राष्ट्रीय आपत्तीसाठी देत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 15 ते 20 शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, अनेकांच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा या आजाराने मृत्यू पावल्या आहेत. शिक्षकांच्या नेमणुका गावपातळीवर कुटुंब सर्वेक्षण, शहरातील बाजाराच्या ठिकाणी ,जिल्हा, तालुका सीमेवर अंतर्गत चेक पोस्ट अशा  ठिकाणी दिल्या आहेत. मात्र तालुका, गाव पातळीवर नेमणुका देताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्‍या तक्रारी शिक्षकांनी संघटनेकडे केल्या आहेत. त्‍या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या असून, समस्‍या सोडविण्याची विनंती केली आहे.

या आहेत समस्‍या…

  • चेक पोस्टवर रोटेशन पद्धतीने नेमणुका करणे आवश्यक असताना एकाच  शिक्षकाच्या सलग पंधरा ते वीस दिवस नेमणूक करण्यात येते.
  • स्थानिक शाळेतील शिक्षकांना सोडून इतर ठिकाणच्या शाळातील शिक्षकांना  नेमणुका देण्यात येत आहेत.
  • सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक, कर्मचारी यांना नियुक्ती देणे आवश्यक असताना काही ठिकाणी फक्त जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना नेमणुका दिल्या जात आहेत.
  • काही तालुक्यांत सकाळी 7 ते रात्री 7 व रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नियुक्ती दिल्या जात आहे. सलग 12 तास नियुक्त्या देणे अन्यायकारक आहे.
  • सक्षम अधिकारी यांचे लेखी आदेश न देता व्हॉट्स अॅपद्वारे आदेश देण्यात येत आहे. त्यामुळे  विमा प्रस्तावास अडचणी येत आहेत.
  • फ्रंट लाईन वर्कर म्हणून सर्व शिक्षकांचे  लसीकरण होणे  गरजेचे आहे, ते अद्यापही झालेले नाही. त्यासाठी शिक्षक कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सदस्याचे लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी तालुका पातळीवर फ्रंट लाईन वर्कर साठी स्वतंत्र कॅम्पचे आयोजित करण्यात यावे.
  • लसीकरण केंद्रावर वारंवार एकाच शिक्षकांच्या नेमणुका केल्या जात आहेत. त्या रोटेशन पद्धतीने करण्यात याव्यात.
  • कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता शिक्षकांना SPO2 तपासणी करण्यास लावण्यात येत आहे.
  • दुर्धर आजाराने ग्रस्त 50 पेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना नेमणुका दिल्या जात आहेत.
  • कोरोनाने मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना 50 लाख रुपये विमा रक्कम अद्यापही न मिळणे वा कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आलेले नाहीत.
  • कोरोना सेंटरवर ज्या शिक्षकांच्या  सेवा आहेत. त्यांना संरक्षणात्मक साहित्‍य देण्यात यावेत. उदा. ग्लोज, सॅनिटायजर, मास्क, पीपीई किट, फेस शिल्ड आदी.
  • शाळेत, गावात तयार केलेल्या विलगीकरण कक्षात रुग्ण नसताना शिक्षकांना थांबावयास लावणे.
  • शिक्षकांना पोलिसांच्या हाताखाली काम करावे लागते. त्याठिकाणी  पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांची शिक्षकांशी वागणूक चांगली नसते, अपशब्द वापरतात.  त्यामुळे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. पोलीस प्रशासनाला याबाबतीत शिक्षकांच्या भावना कळवाव्यात.

यांनी दिले निवेदन…

प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील प्रणित), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात प्रणित), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना शाखा बुलडाणा, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा बुलडाणा या नऊ शिक्षक संघटनांचा समावेश आहे.