‘सोयऱ्या’वर अख्ख्या गल्लीचं प्रेम…! दरवर्षी थाटात बर्थ सेलिब्रेशन; दुसरबीडमधील बाजार गल्लीत काल रात्री रंगला अनोखा ‘सोहळा’!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे… असं संत तुकारामांनी म्हटलंय.. निसर्गावर अतोनात प्रेम करण्याची आपली परंपरा आहे. मात्र आजच्या धावपळीच्या युगात याचे विस्मरण झाल्याचे पहायला मिळते. पण काही जण याला अपवाद असतात. दुसरबीड येथील बाजार गल्लीतील रहिवाशांनी संत तुकारामांनी ज्यांना सोयरे बनवले, त्यांनाच गल्लीत आणलं. संगोपन केलं आणि …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे… असं संत तुकारामांनी म्‍हटलंय.. निसर्गावर अतोनात प्रेम करण्याची आपली परंपरा आहे. मात्र आजच्‍या धावपळीच्‍या युगात याचे विस्‍मरण झाल्याचे पहायला मिळते. पण काही जण याला अपवाद असतात. दुसरबीड येथील बाजार गल्लीतील रहिवाशांनी संत तुकारामांनी ज्‍यांना सोयरे बनवले, त्‍यांनाच गल्लीत आणलं. संगोपन केलं आणि आता हे सोयरे बघता बघता आठ वर्षांचे झाले.. दरवर्षी या सोयऱ्याचं बर्थ डे सेलिब्रेशनही धडाक्‍यात होतंय… यंदा कोरोनामुळे फारसा थाटबाट झाला नसला तरी, उत्‍साह मात्र वाढलेलाच दिसला..! वडाच्‍या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा, त्‍याचे संगोपन काळजीपूर्वक करण्याचा हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वांसाठी आदर्शवतच आहे!!

दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथील जिजामाता कारखाना रोडवरील बाजार गल्लीत 26 मे 2013 रोजी रहिवाशांनी वडाच्या झाडाची फांदी लावली. त्या फांदीचा सांभाळ केला. वटवृक्षाचे केलेले रोपण फळाला आले. बघता बघता ते मोठे होऊ लागले. त्‍यानंतर वटवृक्षाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने मागील आठ वर्षांपासून दरवर्षी न चुकता वटवृक्षाचा वाढदिवस हा उपक्रम बाजार गल्लीतील नागरिकांकडून राबवला जातो. यंदाही  काल, 26 मे रोजी सायंकाळी वट वृक्षाचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. वटवृक्षाला छान सजविण्यात आले होते. लायटिंग लावण्यात आली, फुगे लावण्यात आले. हॅप्पी बर्थ डे टू यू म्‍हणत रहिवाशांनी वटवृक्षाचे यापुढेही संगोपन करण्याची जणू शपथच घेतली.

या वटवृक्षाच्‍या निमित्ताने रहिवाशांतील एकोपाही दिसून आला. वटवृक्षाला दीर्घायुष्य असते. त्‍यातून मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही भरपूर असते. गल्लीलाही यानिमित्ताने दीर्घायुष्य लाभतेय असेच म्‍हणावे लागेल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकेश जैन, महेश दराडे, रणधीर गायकवाड, रवींद्र बुधवत, महेश दराडे, ओमकेश सांगळे, रवि सुपेकर, संजय मोतेकर, एकनाथ सांगळे यांनी पुढाकार घेतला. बाजार गल्ली मित्र मंडळ व द्वार फाउंडेशन वटवृक्षाच्‍या संगोपनासाठी मेहनत घेत असतात.