साहेब, रुग्‍ण अन्‌ त्‍यांच्‍या नातेवाइकांनाही समजून घ्या…!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः साहेब, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रकोप जिल्ह्यात कायम आहे. सरकारी यंत्रणा या आजाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी रात्र्दिवस झटतेय… वैद्यकीय अधिकाऱ्यापासून परिचारिकेपर्यंत अन् अगदी आशासेविकाही… जिल्हा अन् पोलीस प्रशासन सारेच रस्त्यावर आहेत… या यंत्रणेने रुग्णांचा आक्रोश, वेळप्रसंगी संताप सहन केला… कधी कधी अतिरेकही सहन केला… पण यातील …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः साहेब, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रकोप जिल्ह्यात कायम आहे. सरकारी यंत्रणा या आजाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी रात्र्‌दिवस झटतेय… वैद्यकीय अधिकाऱ्यापासून परिचारिकेपर्यंत अन्‌ अगदी आशासेविकाही… जिल्हा अन्‌ पोलीस प्रशासन सारेच रस्‍त्‍यावर आहेत… या यंत्रणेने रुग्‍णांचा आक्रोश, वेळप्रसंगी संताप सहन केला… कधी कधी अतिरेकही सहन केला… पण यातील कुणीही आपल्या कर्तव्यापासून विचलित झाले नाही. पण एका तालुक्‍यातच असे काय घडले, की ज्‍यामुळे कथित ‘देवदूतांना’ आपल्यापर्यंत थेट राजीनामे फेकण्याची वेळ आली? आपल्यापर्यंत येऊन आकाडतांडव ते कोणत्‍या उद्देशाने करत आहेत? राजकारणाच्‍या बरबटलेल्या हातांनी, प्रामाणिक सेवा घडूच शकत नाही… अशा प्रसंगी त्‍यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याऐवजी आपण रुग्‍णांच्‍या नातेवाइकांनाच इशारा दिला…अशातून रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाइकांनी कुणाच्‍या तोंडाकडे पाहायचे? त्‍यांच्‍या तक्रारी ऐकून कोण घेणार?

अवघ्या जिल्ह्यातून फक्‍त याच तालुक्‍यातच रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाइक त्‍या ‘कथित’ देवदूतांना कसे नडतात हाही प्रश्नच आहे. त्‍यांचे कुठे चुकतेय का, ते आपल्या कर्तव्यापासून विचलित झालेत का, रुग्‍ण त्‍यांच्‍या नावाने का टाहो फोडताहेत? हे कोण बघणार? सध्याची वेळ संयमाची आहे. ज्‍याने त्‍याने तो ठेवून केवळ कोरोना हा एकमेव शत्रू डोळ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. रुग्‍ण जगण्या मरण्याच्‍या टप्‍प्‍यात आहेत, कोरोनाच्‍या संकटात आधीच कंगाल झालेले त्‍यांचे नातेवाइक जमिनी विकून, घर विकून उपचार खर्च भागवत आहेत.

अशात त्‍यांच्‍या भावना नेत्‍यांपर्यंत पोहोचवत असतात. अशावेळी नेते त्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतील आणि त्‍यामुळे कथितांचे ‘उद्देश’ साध्य होण्यात अडथळा येत असेल आकाडतांडव होणारच… ते खासगी आहेत म्‍हणून ते निराश झाले… पण वर्षभरापासून सरकारी यंत्रणाही याच संकटाशी सतत लढत आहे. सेवेत असताना त्‍यांनाही रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाइकांच्‍या संतापाचा सामना करावाच लागला आहे. त्‍यांना तर यांच्‍याहीपेक्षा जास्त अडचणी आहेत, पण ते निराश, दुःखी, संतप्‍त झाल्याचे गेल्या सव्वा वर्षात तरी ऐकिवात आले नाही. उलट ते अधिक जोमाने या समस्‍येचा सामना करत आहेत. त्‍यांनी कुणीही पळपुटेपणा दाखवलेला नाही. घरच्‍यांना संसर्ग नको म्‍हणून त्‍यातील अनेक जण कित्‍येक महिन्यांपासून घरापासून दूर आहेत. त्‍यांना किती नैराश्य येत असेल? बरं जिल्ह्यातही फक्‍त याच तालुक्‍यातील ‘कथित’ देवदूतांना प्रचंड अडचणी आहेत का? की त्‍यामुळे त्‍यांना थेट कर्तव्‍यापासून पलायन करण्याची वेळ यावी? प्रश्न, समस्या अनेक आहेत… पण सध्या कर्तव्य हे एकमेव लक्ष्य पुढ्यात ठेवण्याची गरज आहे. ज्‍यांना हे लक्ष्य कळत नाही, त्‍यांचा नक्‍की प्रॉब्‍लम काय आहे हे समजून घेण्याची, त्‍याची चौकशी करण्याची मग नक्‍कीच गरज निर्माण होते…