रुग्‍णाचे ऑपरेशन सुरू असतानाच डॉक्‍टरांना हार्ट ॲटॅक; सिंदखेड राजाचे सुपूत्र असलेल्या प्रसिद्ध डॉक्‍टरांवर काळाचा घाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एका रुग्णावर शस्त्रक्रिया करत असताना ऑपरेशन थिएटरमध्येच डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका आला. सहकारी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचले नाहीत. काल, 26 जूनला दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. डॉ. दिग्विजय दशरथ शिंदे (35, रा. ताडशिवणी ता. सिंदखेडराजा) असे डॉक्टरांचे नाव आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच दुसरबीड आणि ताडशिवणी परिसरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एका रुग्णावर शस्‍त्रक्रिया करत असताना ऑपरेशन थिएटरमध्येच डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका आला. सहकारी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्‍यांचे प्राण वाचले नाहीत. काल, 26 जूनला दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. डॉ. दिग्विजय दशरथ शिंदे (35, रा. ताडशिवणी ता. सिंदखेडराजा) असे डॉक्टरांचे नाव आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच दुसरबीड आणि ताडशिवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. औरंगाबादच्‍या पैठण रोडवरील गोल्डन सिटी हॉस्पिटलमध्ये ते रुग्‍णसेवा देत होते.

24 तास रुग्णसेवेत स्वतःला झोकून देऊन काम करणारे प्रेमळ, शांत, संयमी व अतिशय हुशार म्‍हणून ते सुपरिचित होते. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे असे डॉक्‍टर क्‍वचितच. त्‍यांचे एमबीबीएस, एमडीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांचे वडील डॉ. दशरथ शिंदे हे दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. एका रुग्णावर अन्ननलिकेची शस्रक्रिया करण्यात येत होती. यावेळी डॉ. दिग्विजय शिंदे यांच्यासोबत अन्य सहकारी डॉक्टरही होते. शस्‍त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना ऑपरेशन थिएटरमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित सहकारी डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. लगेच हृदयविकार तज्‍ज्ञांना बोलावण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ. शिंदे यांचा मृत्यू झाला. आज, 27 जून रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्यावर दुसरबीड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.