मृत्यूच्या तांडवाने ‘ब्रेक द चेन’चा वाढला मुक्काम! पंधरवड्यातच 15 हजारांवर पॉझिटिव्ह अन्‌ 91 जणांचे बळी!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील कोरोनाचे थैमान व मृत्यूचे तांडव कायम असल्यानेच जिल्ह्यातील ब्रेक द चेनचा अर्थात कडक निर्बंधाचा मुक्काम वाढल्याचे स्पष्ट आहे. सरत्या एप्रिल महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यातील कोरोनाच्या आकडेवारीचा आढावा घेतला तर जीवाचा थरकाप उडविणारे आकडे सामोरे येतात. यामुळे व आणखी प्रसार रोखण्यासाठी हा मुक्काम लांबणे आवश्यक आहे असेच एकूण …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः  राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील कोरोनाचे थैमान व मृत्यूचे तांडव कायम असल्यानेच जिल्ह्यातील ब्रेक द चेनचा अर्थात कडक निर्बंधाचा मुक्काम वाढल्याचे स्‍पष्ट आहे. सरत्या एप्रिल महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यातील कोरोनाच्या आकडेवारीचा आढावा घेतला तर जीवाचा थरकाप उडविणारे आकडे सामोरे येतात. यामुळे व आणखी प्रसार रोखण्यासाठी हा मुक्काम लांबणे आवश्यक  आहे असेच एकूण चित्र आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलचा दुसरा पंधरवडा घातक ठरलाय. या कालावधीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांची  दिवसाकाठीची सरासरी 1 हजारांवर येते. याच काळात दर दिवशी सरासरी 6 रुग्णांचा मृत्यू झालाय, अशी ही आकडेवारी सांगतेय. 16 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तब्बल 15 हजार 33 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  या दरम्यान 91 रुग्णांचा  उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यापूर्वी 16 ते 25 एप्रिल दरम्यान हा आकडा 10 हजार 223 पॉझिटिव्ह अन्‌ 54 बळी असा होता. यामुळे कोरोनाचा उद्रेक, तीव्रता, पॉझिटिव्ह  होण्याचा दर, मृत्यू संख्या यात किंचितही घट न झाल्याने कडक निर्बंध 15 मे पर्यंत वाढविण्यात आले.

तुटवड्याचेही तांडव…

दरम्यान हा पंधरवडा संबंधित साहित्याच्या तुडवड्याने देखील गाजला. रुग्णालयात बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या, अनेक ठिकाणी यामुळे आणीबाणीचे प्रसंग ओढवले. ऑक्सिजन चा तुटवडा तर जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजलेला! तुटपुंजा साठा येतो, संपतो मग पुन्हा मागणी, जीवघेणी प्रतीक्षा, हे गंभीर व दुर्दैवी चित्र कायम राहिले. रॅमिडीसीविरची बोंब मुक्कामीच आहे.  यामुळे पुन्हा कडक निर्बंध लादणाऱ्या प्रशासनाने या समस्या दूर करण्यावर भर द्यावा, अशी महाराष्ट दिनी माफक अपेक्षा!