जिल्हा ‘लॉकडाऊन’… रस्‍ते सुनसान!! जिल्हाधिकारी स्‍वतः रस्‍त्‍यावर, पोलिसांकडे ‘हयगय’ नाहीच!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, 10 मेच्या रात्रीपासून जिल्ह्यात प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. रात्री आठनंतरही वाहने, लोक रस्त्यावर फिरत असल्याने खरेतर हेही कडक निर्बंध हवेतच उडतात की काय, अशी शंका निर्माण झाली होती. पण सकाळपासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी ‘लॉकडाऊन’च्या शंभर टक्के अंमलबजावणीला सुरुवात केली. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांना …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल, 10 मेच्‍या रात्रीपासून जिल्ह्यात प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. रात्री आठनंतरही वाहने, लोक रस्‍त्‍यावर फिरत असल्याने खरेतर हेही कडक निर्बंध हवेतच उडतात की काय, अशी शंका निर्माण झाली होती. पण सकाळपासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी ‘लॉकडाऊन’च्‍या शंभर टक्‍के अंमलबजावणीला सुरुवात केली. विनाकारण रस्‍त्‍यावर येणाऱ्यांना सुनावत दंडही वसूल केला. काही फटक्‍यांचा प्रसादही देण्यात आला. त्‍यामुळे गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनची आठवण बुलडाणेकरांना झाली आहे.

जिल्ह्यातील तालुक्‍याची सर्व शहरे आणि मोठी गावे सील करण्यात आली आहेत. त्‍या त्‍या नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींनी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. अत्‍यावश्यक कामाव्‍यतिरिक्‍त बाहेर पडणाऱ्यांकडून दंड आकारत आहेत. जोडीला पोलीस दादा असल्याने लॉकडाऊन यशस्वी होताना दिसत आहे. बुलडाणा शहरात स्‍वतः जिल्हाधिकाऱ्यांनी रस्‍त्‍यावर उतरून कारवाई केली. अत्‍यावश्यक सेवेव्‍यतिरिक्‍त कुणी फिरताना आढळले तर दंडही आकारला. शहरात लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात आहे. यात 8 पोलीस अधिकारी, 65 महिला-पुरुष कर्मचारी, यात 10 महिला कर्मचारी, 15 होमगार्ड कर्तव्‍यतत्‍पर दिसले. 15 ठिकाणी फिक्‍स पॉईंट लावण्यात आले असून, 6  पेट्रोलिंग वाहने लक्ष ठेवून आहेत. जयस्‍तंभ चौक, धाड नाका, सहकार विद्या मंदिर, संगम चौक, इकबालनगर, जनता चौक, चिंचोले चौक, त्रिशरण चौक, सामान्य रुग्‍णालय, स्‍टेट बँक चौक, मलकापूर नाका भागात बंदोबस्‍त तैनात दिसत आहे. नगरपालिकेनेही 5 पथके तयार केली असून, ती पोलीस ठाण्यासमोर, त्रिशरण चौक, चिंचोले चौक, धाड नाका, मलकापूर नाका या ठिकाणी तैनात आहेत. पोलीस आणि नगरपालिका पथकांनी मिळून सकाळपासून वृत्त लिहिपर्यंत 11 हजार रुपये दंड आकारला आहे.

मुख्य रस्‍ते ओस, गल्ल्यात भटकंती सुरूच…

मुख्य रस्‍त्‍यांवर पोलिसांनी बंदोबस्‍त तैनात केला असला तरी गल्ल्यांत मात्र भटकंती सुरूच आहे. त्‍यामुळे लॉकडाऊन परिणाम साधला जाईल का, हा प्रश्नच आहे. गल्ल्यांतील किराणा दुकानेही सुरूच असून, तिथे ‘पुड्या’  घेणाऱ्यांची वर्दळ कायम आहे. घराला लागून असलेल्‍या अनेक दुकानांचे शटर अर्धे बंद तर अर्धे उघडे असे चित्र आहे. केवळ मुख्य रस्‍ते बंद करून लॉकडाऊनचा उद्देश साधला जाणार नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष जाण्याची गरज असून, दंड करणारी वाहने गल्ल्यांत गेली आणि त्‍या त्‍या दुकानदारांना आणि विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना तंबी दिली तरच उपयोग होणार आहे.