गौण खनिज रॉयल्टीपोटी तब्बल 82 कोटींची वसुली! दुष्काळात शासकीय तिजोरीत मोलाची भर

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शासकीय तिजोरीत ठणठणाट असताना व कोरोनाविरुद्धच्या लढ्यामुळे निधीचा तुटवडा असताना गौण खनिज रॉयल्टीपोटी जिल्ह्यातून तब्बल 81 कोटींच्यावर वसुली करण्यात आली. यामुळे शासकीय तिजोरीत मोलाची भर पडली आहे. गौण खनिज स्वामीत्वधन संकलन अंतर्गत जिल्ह्याला सन 2020- 21 या आर्थिक वर्षात 93 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते. कोरोना विरुद्धच्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः शासकीय तिजोरीत ठणठणाट असताना व कोरोनाविरुद्धच्या लढ्यामुळे निधीचा तुटवडा असताना गौण खनिज रॉयल्टीपोटी जिल्ह्यातून तब्बल 81 कोटींच्यावर वसुली करण्यात आली. यामुळे शासकीय तिजोरीत मोलाची भर पडली आहे.

गौण खनिज स्वामीत्वधन संकलन अंतर्गत जिल्ह्याला सन 2020- 21 या आर्थिक वर्षात 93 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते. कोरोना विरुद्धच्या लढ्यात महसूल यंत्रणा गुंतल्या आहेत. तसेच मध्यंतरी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. याशिवाय दैनंदिन कामकाज, भरमसाठ रिक्त पदे,  पॉझिटिव्ह आलेले कर्मचारी या अनेक अडचणींचा सामना करूनही महसूल यंत्रणांनी 88 टक्के म्हणजे 81 कोटी 60 लाख 72 हजार 317 रुपये इतकी वसुली केली.

शेवटच्या टप्प्यात 29 कोटी केले वसूल

दरम्यान, 1 एप्रिल 2020  ते 28 फेब्रुवारी 2021 पावेतो  53 कोटी रुपये इतकीच वसुली करण्यात आली. मात्र जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी एसडीओ, तहसील कार्यालयांना कामाला जुंपले. यामुळे एकट्या मार्च महिन्यात तब्बल 28 कोटी 57 लाख 76 हजार रुपये वसूल करण्याचा पराक्रम यंत्रणांनी केला. यासाठी खनिकर्म अधिकारी डॉ. राठोड, संजय वानखेडे, राजेंद्र एंडोले, प्रशांत रिंढे यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले.