खा. जाधव यांचे आदेश : रेती घाटांवर सीसीटीव्‍ही कॅमेरा लावा, दर १५ दिवसांनी मोजमाप करा!; दिशा समितीची बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेती घाटांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. रेती घाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेतीघाट सुरक्षित करावे. या घाटांचे दर 15 दिवसांनी मोजमाप करून अहवाल घ्यावा, असे आदेश खासदार केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज, १६ जुलैला दिले. केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेती घाटांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. रेती घाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेतीघाट सुरक्षित करावे. या घाटांचे दर 15 दिवसांनी मोजमाप करून अहवाल घ्यावा, असे आदेश खासदार केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज, १६ जुलैला दिले. केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास साधावा, अशी सूचनाही त्‍यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार जाधव बोलत होते. व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, बुलडाणा बाजार समिती सभापती जालिंधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्‍हा परिषद सभापती राजेंद्र पळसकर आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात समितीचे अशासकीय सदस्य, लोक प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. सांसद आदर्श ग्राम योजनेत निवडलेल्या गावांमध्ये विविध योजनांच्या समन्वयातून विकास कामे करण्याच्या सूचना करत खासदार जाधव म्हणाले, घाटबोरी, घाटपुरी, शेलूद, धानोरा व पिंप्री गवळी ही गावे सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेली आहे. या गावांमध्ये नाविण्यपूर्ण कामे करण्यत यावीत. ग्रामसचिवालय इमारत, ग्रा.पं. कार्यालय व शाळेवर सौर उर्जा संयंत्र लावणे, पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर आणणे, अंगणवाडी बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व भूमिगत गटार योजना कामे या गावांमध्ये करण्यात यावीत. त्यासाठी विविध विभागांनी त्यांच्याकडील कामे करताना या गावांमध्ये प्राधान्याने कामे घ्यावीत. या गावांमधील शाळा आयएसओ करून गावात वाचनालये, अभ्यासिका देण्यात याव्यात, असे ते म्‍हणाले.
म्हाडा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलामध्ये लाभार्थ्यांची निवड नगरपालिका व म्हाडाने संयुक्तपणे करावी. त्यापूर्वी नगर पालिका क्षेत्रात लाभार्थी सर्वेक्षण करून नगर पालिकेकडून संभाव्य लाभार्थ्यांची यादी घ्यावी. एकात्मिक गृहनिर्माण योजनेतंर्गत जिल्ह्यात घरकुले बांधण्यात आली आहेत. मात्र ही घरकुले खऱ्या लाभार्थ्यांना मिळाली की नाही, त्याची पडताळणी करून कारवाई करावी. बोगस लाभार्थी राहत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. रस्ता निर्मिती करताना कुठलीही तडजोड करण्यात येऊ नये. डिपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) मध्ये चेंज ऑफ स्कोप नुसार बदल करून समाज हिताची कामे घ्यावीत. जिगाव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील 22 गावांचे पुनर्वसन करायचे आहे. या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे दर्जेदार व्हावीत. अंदाजपत्रकानुसार कामे करावीत, कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जावे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून लागणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही खासदार जाधव यांनी केली.

भारत नेट, महानेट प्रकल्पातंर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मलकापूर, नांदुरा, बुलडाणा व चिखली या 4 तालुक्यांमध्ये कामे पूर्ण करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाने कामे हस्तांतरीत करताना ती पूर्ण झाली की नाही, याची चाचपणी करावी. यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीला नेट कनेक्टीव्हीटी देण्यात यावी. त्यानंतर ग्रामस्थांचे ऑनलाईन कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये काढून द्यावीत, असेही जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यात आले. मात्र त्यापैकी 108 अंगणवाडी बांधकाम अपूर्ण आहेत. ती कामे शासनाची मंजुरात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावी. अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा तपासावा. सँपल नुसार पोषण आहार देण्यात येतो की नाही, नियमानुसार पोषण आहाराचे वजन आहे किंवा नाही याची संबंधित विभागाने तपासणी करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. शाळांना मानव विकास मिशनमधून साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्याचा दर्जा तपासावा. साहित्य निकृष्ट असल्यास संबंधित पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशही जाधव यांनी दिले. यावेळी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.