अण्णाभाऊंच्‍या अप्रकाशित साहित्याच्‍या प्रकाशनासाठी पुढे या; व्याख्यानमालेत पत्रकार राजेंद्र काळे यांचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काळजातून शब्द कागदावर उमटतात तेव्हा साहित्यकृती निर्माण होते. त्याअर्थानं समाजाच्या अन् उपेक्षितांच्या वेदनांची ‘सल’ ठेवून लिहिल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची साहित्य निर्मिती ‘अस्सल’ ठरली अन् ते खऱ्या अर्थाने साहित्यरत्न ठरले, असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. काळाच्या ओघात अण्णाभाऊंचे जे अप्रकाशित साहित्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा शोध घेऊन त्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काळजातून शब्द कागदावर उमटतात तेव्हा साहित्यकृती निर्माण होते. त्याअर्थानं समाजाच्या अन् उपेक्षितांच्या वेदनांची ‘सल’ ठेवून लिहिल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांची साहित्य निर्मिती ‘अस्सल’ ठरली अन् ते खऱ्या अर्थाने साहित्यरत्न ठरले, असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. काळाच्या ओघात अण्णाभाऊंचे जे अप्रकाशित साहित्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा शोध घेऊन त्या साहित्याच्या प्रकाशनासाठी विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात अण्णाभाऊ साठे सोशल फोरमने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

२० जुलै ते १ ऑगस्ट म्हणजेच अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी ते जयंतीदरम्यान अण्णाभाऊंच्या नावाने आयोजित व्याख्यानमालेचे नववे पुष्प २६ जुलैला सायंकाळी ऑनलाइन पध्दतीने पत्रकार राजेंद्र काळे यांनी गुंफले. प्रास्‍ताविक आयोजक अ‍ॅड. डिगांबर अंभोरे यांनी केले.
श्री. काळे म्‍हणाले, की परिवर्तनाला दिशा अन् चालना देणाऱ्या अण्णाभाऊंच्‍या साहित्यांनी महाराष्ट्राच्या एकूणच जडण-घडणीत मौलीक असे योगदान दिले. त्यांच्या अजरामर अशा साहित्यकृतींनी उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजविण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्या शाहीरीने केले. उपजत बुध्दीवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येऊ शकतो. म्हणून आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यकृतींच्या संशोधनात्मक अभ्यास करतात, असेही ते म्‍हणाले. अण्णाभाऊंच्या साहित्याचा अन् त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी तब्बल १३ पुस्तकं आतापर्यंत अन्य साहित्‍यिकांची प्रकाशित झाल्याची माहितीही श्री. काळे यांनी दिली.