लग्नासाठी मागणी घालायला आला अन् मुलगी पळवून घेऊन गेला…
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नासाठी मागणी घालायला आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना जवळा (ता. मेहकर) येथे समोर आली आहे.
जवळा येथील अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी याच गावातील मूळ रहिवासी परंतु सध्या पुणे येथे राहत असलेला मुलगा आला. त्याने मुलीच्या वडिलांना लग्नाबाबत बोलणी केली. मात्र सध्या मुलीचे शिक्षण सुरू आहे आणि अद्याप लग्नाचे वय पूर्ण झाले नाही, असे सांगून मुलीच्या वडिलांनी तूर्त लग्नास नकार दिला. मात्र या तरुणाने १७ वर्षीय मुलीला ६ मार्च रोजी पळवून नेले. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी आज डोणगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल नरेंद्र अंभोरे करीत आहेत.