धामणगाव बढेत चोरट्यांचा उच्छाद!; तीन दुकाने फोडली, काळीपिवळीची बॅटरीही नेली चोरून..!
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धामणगाव बढे (ता. मोताळा) येथे चोरट्यांनी उच्छाद मांडून रात्रीतून तीन दुकाने फोडली. पानटपरी, मेडिकल स्टोअर आणि पतंजली स्टोअर फोडून चोरट्यांनी १६ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला. ही घटना काल, ५ जुलैला सकाळी समोर आली आहे. धामणगाव बढे पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कलीम खाँ शब्बीर खाँ (२८, रा. धामणगाव बढे ता. मोताळा) या पानटपरी चालकाने या प्रकरणात तक्रार दिली. त्याची पानटपरी फोडून चोरट्याने रोख ११ हजार ४०० रुपये, एक एमआर कंपनीची बॅटरी (किंमत ४ हजार रुपये) असा एकूण १५ हजार चारशे रुपयांचा माल चोरून नेला. गावातील अमोल मेडिकलसुध्दा फोडलेले दिसले व त्यातून तीनशे रुपये चोरीस गेलेले दिसले. पतंजली स्टोअर्सचे सुध्दा शटरचे कुलूप तोडून त्यामधूनही अकराशे रुपये चोरीस गेले. शेख सादीक शेख करामत यांच्या मालकीची घरासमोर उभी केलेल्या काळी पिवळीची बॅटरी (किंमत चार हजार रुपये) चोरट्यांनी लांबवली. पोहेकाँ श्री. सोनवने तपास करत आहेत.