नाव सार्थ ठरवत बुलडाणा वाॅरिअर्स ठरला विजेता! चिखली चॅलेंजर्स उपविजेता; लीगल प्रीमियर लीग स्पर्धा

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या न्यायिक वर्तुळात प्रथमच आयोजित लीगल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपल्या नावाप्रमाणेच योद्‌ध्यासारखे प्रदर्शन करणाऱ्या बुलडाणा लीगल वाॅरिअर्स या वकिलांच्या संघाने विजेतेपद पटकावले! दुसरीकडे भल्याभल्या संघांचे आव्हान पेलणाऱ्या चिखली चॅलेंजर्स संघाने अंतिम सामन्यात जोरदार झुंज देताना  उपविजेतेपदाचा मान मिळविला. धुव्वाधार फटकेबाजी करणारा राहुल मेहेर स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज तर आपल्या गोलंदाजीने भल्याभल्यांची दांडी गुल करणारा जावेद चौधरी सर्वोत्तम बॉलरचे मानकरी ठरले.

या स्पर्धेत जिल्ह्याच्या न्यायिक वर्तुळातील न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांचे तब्बल १८ संघ सहभागी झाले. बुलडाणा येथील जिजामाता प्रेक्षागार, जिल्हा क्रीडा संकुल व एडेड हायस्कूल या मैदानांवर 26 व 27 मार्च रोजी हे 10 ओव्हर्सचे सामने पार पडले. अंतिम सामन्यात ॲड. दर्शन बरडे यांच्या नेतृत्वाखालील बुलडाणा लीगल वाॅरिअर्सची गाठ श्री. यंगड कर्णधार असलेल्या चिखली चॅलेंजर्स संघाशी पडली. बुलडाणा संघाने कसलेल्या योध्यासारखे आक्रमण करत केवळ 5 गडी गमावून 10 षटकांत 96 धावांचा डोंगर उभारला! प्रत्युत्तरात चिखली संघाने जोरदार झुंज देत 7 गडी बाद 73 धावापर्यंत मजल मारली. मात्र मोक्याच्या क्षणी गडी बाद झाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दमदार कारवाई करणारे शिवशंकर सावळे सामनाविराचे मानकरी ठरले.

वाॅरिअर्सच्या हाती चषक अन्‌ एकच जल्लोष...
दरम्यान, जिल्हा न्यायालयात स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे, एस. व्ही. खोंगल, पी. ए. साने, एस. व्ही. केंद्रे, बुलडाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे, जिल्हा सरकारी वकील आशिष केसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते एलपीएल चषक स्वीकारून वर उंचावताच एकच जल्लोष करण्यात आला. स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम करणारे अंपायर्स, समालोचक, स्कोअरर आदींचाही सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी न्यायाधीशवृंद,  न्यायदंडाधिकारी ( प्रथमवर्ग) अमोल देशपांडे, प्रदीप उर्फ बाळू शिंदे, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

न्यायमूर्तींनी लगावले 3 चौकार!
अल्पावधीत आयोजन व नियोजनाद्वारे पार पडणारी ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण देखील ठरली. अध्यक्षीय एकादश व न्यायाधीश एकादशमधील प्रदर्शनीय सामन्यात प्रमुख न्यायाधीशानी सलग 3 फोर लगावत धमाल उडवून दिली! दुसरीकडे एडेडवर पार पडलेला खामगाव किंग व बुलडाणा ब्राव्हो या संघातील सामना टाय झाला! दोन्ही संघांची धावसंख्या समान झाल्याने अखेर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला!! यात बुलडाणा संघ सुपर विजेता ठरला.