शुभेच्छांसाठी नव्हे तर कोरोनाच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी पुढे या!; रविकांत तुपकर यांचे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना आवाहन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा छोटा उत्सव, गेट- टूगेदरचे निमित्त राहते, राजकीय नेत्यांसाठी तर वाढदिवस सुद्धा एक पोलिटिकल इव्हेंट, कथित लोकप्रियता सिद्ध करण्याचा एक फंडा ठरतो. सर्वत्र बॅनर, पोस्टर्स, हार तुरे, बुके, दिखाऊ कार्यक्रम अन् धुव्वाधार भाषणबाजी, कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव असा थाटमाट राहतो. मात्र याला काही स्वाभिमानी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा छोटा उत्सव, गेट- टूगेदरचे निमित्त राहते, राजकीय नेत्यांसाठी तर वाढदिवस सुद्धा एक पोलिटिकल इव्हेंट, कथित लोकप्रियता सिद्ध करण्याचा एक फंडा ठरतो. सर्वत्र बॅनर, पोस्टर्स, हार तुरे, बुके, दिखाऊ कार्यक्रम अन्‌ धुव्वाधार   भाषणबाजी, कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव असा थाटमाट राहतो. मात्र याला काही स्वाभिमानी व अजूनही स्वतःला कार्यकर्ते म्हणवून घेण्यात अभिमान मानणारे अपवाद असणारे नेतेही आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते, मुलूखमैदानी तोफ अन्‌ जणू काही चळवळ व आंदोलनासाठीच जाहला आपुला जन्म असे मानणारे रविकांत तुपकर यातील दुसऱ्या जातकुळातील, त्यामुळे त्यांचा वाढदिवस कधी येतो, कधी जातो हे अनेकदा कळत नाय! वाढदिवसाला याचे कारण अनेकदा हॅपी बर्थडेलाही हे महाशय कधी आंदोलनात, कधी दूरवर पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारसभा गाजविण्यात मग्न असतो तर क्वचित प्रसंगी ‘आत’ किंवा जमानतीसाठी तारखेवर बी असू शकतो. यामुळे 13 मे रोजी रविकांत तुपकर बुलडाण्यात असलेच तर ते घरातले सदस्य, नातेवाईक आणि हजारो कार्यकर्ते असे मिळून तयार होणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी एक पर्वणी किंबहुना आनंदोत्सवच ठरतो! यंदा तो महायोग ( कोरोनाकृपेने)  जुळून आलाय, मात्र यातही दिखाऊ कार्यक्रम, हारतुरे, सत्कार असा कार्यक्रम , बॅनर्स- पोस्‍टरबाजी ना करता कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी सामोरे या, कोविड सेंटर उभारण्यासाठी दान करा, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. त्यांनी सध्या केवळ आणि केवळ कोरोनाविरुद्ध लढण्यात व लोकसहभागातून  किन्होळ्यात उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रमलेल्या या नेत्याने म्हणूनच उद्या 13 मे रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त आपल्या असंख्य चाहते, कार्यकर्ते, शुभ चिंतकाना शुभेच्छा देण्याऐवजी कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी सामोरे या असे कळकळीचे आवाहन  जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला केलंय!

गेल्या वर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत ते स्वत: आणि ‘स्वाभिमानी’ हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांची चमू सातत्याने गरजूंना मदत करत आहे. राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकून पडलेल्या शेकडो विद्यार्थी, मजुरांना मदतीचा हात दिला. शेकडो गरजु कुटुंबांना मदत मिळवून दिली,  अनेक रुग्णांना उपचार मिळवून दिले. रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबिराचे आयोजन केले. पहिल्या लॉकडाऊनपासून ते आता थेट दुसऱ्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजे गेल्या दीड वर्षापासून जनसेवेचं काम अविरत सुरू आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त हार-तुरे पुष्पगुच्छ आणू नये, लॉकडाऊनचे नियम मोडून कोणीही भेटीसाठी येऊ नये. आपल्या शेजारी जो कोणी रुग्ण आहे, त्याला मदत करा, लॉकडाऊनमुळे ज्यांचे संसार डबघाईस आले त्यांना सहकार्याचा हात द्यावा. शुभेच्छा देण्यासाठी नव्हे तर कोरोनाचे तुफान परतवून लावण्यासाठी पुढे या, असे भावनिक आवाहन या युवा नेत्याने केले  आहे.