Success Story : अशक्य काहीच नसतं.... अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडेंच्या जिद्दीचा थक्क करणारा प्रवास!
कृष्णा सपकाळ, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा लाइव्ह
२१ जानेवारी १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुई येथे गरीब शेतकरी, शेतमजूर कुटुंबात बजरंग बनसोडे यांचा जन्म झाला. कोरडवाहू शेती असल्याने सततची नापिकी. त्यामुळे शेती आणि मजुरी यावरच बनसोडे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत होता. गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी आणि त्यानंतर गावातीलच शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत आठवी ते दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण शिक्षण झाले. १९९४ ला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांना ८२ टक्के गुण मिळाले आणि ते तालुक्यातून अव्वल ठरले. दहावीनंतर तालुक्याच्या ठिकाणी जावे, सायन्स घ्यावे आणि चांगले गुण मिळवून मेडिकलला जावे ही त्यावेळी त्यांची इच्छा. त्यामुळे त्यांनी अकरावी सायन्सला प्रवेश घेतला.
७०० रुपये नव्हते म्हणून सायन्स सोडावे लागले...
११ वीनंतर १२ वी सायन्ससाठी कॉलेजचा समर व्हेकेशनचा कोर्स होता. त्यासाठी ७०० रुपये शुल्क होते. शिक्षकांनी दोन - तीनदा फीसाठी विचारल्यानंतर मनाला वाईट वाटले. पैसे नसल्याने सायन्स सोडून १२ वी आर्टला ॲडमिशन घ्यावे लागले, असे श्री. बनसोडे सांगतात. १२ वी आर्टला ७० टक्के गुण मिळाले आणि त्यानंतर त्यांनी डीएडला प्रवेश घेतला. डीएडच्या फायनलला असताना त्यांनी ७१ टक्के इतके गुण मिळवले.
शिक्षक म्हणूनही यशस्वी...
शिक्षण सुरू असताना गरजा पूर्ण करण्यासाठी पाइपलाइनच्या चऱ्या खोदणे, ऊसतोड करणे, बांधकाम मजूर म्हणून काम करणे, खड्डे खोदणे यासारखी सगळीच कामे बजरंग बनसोडे यांनी केली. डीएड झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेतून मुलाखतीचे बोलावणे आले, त्यावेळी बजरंग बनसोडे गावातीलच एका व्यक्तीच्या घरी ५० रुपये रोजाने बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम करत होते. काम सुरू करून तीन दिवस झाले होते, मात्र मुलाखतीसाठी जायचे असल्याने त्या काकांनी पाच दिवसांची मजुरी म्हणून २५० रुपये दिल्याचे ते सांगतात. मुलाखतीसाठी आवश्यक असलेला पांढरा शर्ट नसल्याने दुसऱ्याचा घेऊन जावा लागला. मुलाखतीच्या आदल्या दिवशी उस्मानाबादच्या बसस्टँडवर रात्र काढली. सकाळी २ रुपये देऊन अंघोळ केली आणि मुलाखतीसाठी पोहोचलो, असे श्री. बनसोडे सांगतात. त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात ४६५ शिक्षकांची भरती झाली होती. त्यात बजरंग बनसोडे हे टॉपला होते. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील साकद खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर काहीच दिवसांत बीड जिल्हा परिषदेची भरती निघाल्याने त्यांनी बीड जिल्ह्यात नोकरी करायचे ठरवले.
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीत निवड झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील सिपेगावच्या पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी मुलांना घडविण्याचे काम सुरू केले. नोकरी लागल्यानंतर लगेच कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले. २००१ ते २००८ असे सलग ८ वर्षे श्री. बनसोडेंनी सिपेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यापनाचे कार्य केले. त्या कालावधीत गुणवत्ता अभियानात शाळेने तालुक्यात पहिला आणि जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. स्कॉलरशिपच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी नाव कमावले. चौथ्या वर्गातील मुलं त्यावेळी खडाखडा मराठी वाचू लागले. गावच्या मंदिरात पोथी वाचू लागले. आधी गावात साधे पत्र वाचायची अडचण होती. त्यामुळे ही उपलब्धी समाधानकारक होती, असे बजरंग बनसोडे सांगतात. त्यांनी शिकविलेले अनेक विद्यार्थी आज समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर आहेत. आजही त्या गावाशी त्यांची नाळ पक्की जुळलेली आहे. अजूनही विद्यार्थी संपर्कात आहेत फोन करतात तेव्हा आनंद वाटतो, असे श्री. बनसोडे सांगतात.
जिल्हा परिषद शाळेतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी सुरू असताना श्री. बनसोडे यांनी बाह्य विद्यार्थी म्हणून २००५ मध्ये बीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेता घेता स्वतःचाही अभ्यास सुरू ठेवला. २००५ ला पीएसआय मेन्स एका गुणाने आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा एका गुणाने हुकली. त्यामुळे कोणताही क्लास न लावता, कोणतेही मार्गदर्शन न मिळता एवढे मार्क मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले, असे बजरंग बनसोडे यांनी सांगितले. २००५ आणि २००६ मध्ये दोनदा पीएसआयसाठी निवड झाली. २००९ ते २०१० यादरम्यान त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून नोकरी केली. त्यानंतर २०१० -२०११ मध्ये राज्यसेवा उत्तीर्ण होऊन परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून सुद्धा काम केल्याचे त्यांनी सांगितले. २००७ च्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले. त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २०११ मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग झाली.
पहिल्यांदा चप्पल घातली...
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. दहावीत असताना पहिल्यांदा चप्पल घातल्याची आठवण त्यांनी सांगितली. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून ६ हजार ४३५ रुपये पगार मिळाला. मात्र खाण्या पिण्याचे, तेला मिठाचे वांधे होते. त्यामुळे पहिला पगार कशात गेला कळलेच नाही, असे त्यांनी सांगितले. २००५ मध्ये पीएसआयच्या शारीरिक चाचणीसाठी गेल्यानंतर धावण्यासाठी पहिल्यांदा बूट घेतला. मात्र बूट घालून पळण्याची सवयच नसल्याने पायातला बूट काढून धावलो, असे ते सांगतात. मिरजमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. शहराला जातीय दंगलीचा इतिहास होता. अनेक प्रकरणे चौकशीवर होती. मात्र याही परिस्थितीत शांतता आणि समाजात विश्वास निर्माण करण्यात श्री. बनसोडे यांना यश मिळाले. २०१५ ते २०१७ दरम्यान अहमदनगर शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी, २०१७ ते २०१८ नाशिक, २०१८ -२०१८ ट्रोम्बे डिव्हिजन मुंबई येथे एसीपी, २०१९ - २०२० एसपी स्पेशल ऑपरेशन मुंबई आणि त्यानंतर २० ऑक्टोबर २०२० ते आजपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा असा श्री. बनसोडे यांचा कार्यकाळ राहिला आहे.
उपेक्षा नव्या अपेक्षांना जन्म घालतात...
जीवन जगताना आई- वडिलांच्या आणि कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या उपेक्षा यामुळेच नव्या अपेक्षांचा जन्म झाला आणि इथपर्यंत पोहोचलो असल्याचे ते अभिमानाने सांगतात. २०१० ला उपविभागीय पोलीस अधिकारी झाल्याची बातमी देऊळगाव राजातून आईला फोनवरून कळवली, तेव्हा आधीची हातात असलेली पीएसआयची नोकरी सोडू नये, असे आईला वाटत होते. आई वडिलांचे कष्टाचे चीज करता आले ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे ते सांगतात.
स्वतःवर विश्वास ठेवा, निष्ठा सत्यावर ठेवा...
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गडबडीचा मार्ग शोधल्यापेक्षा सातत्याने कष्ट करावे. यश तुमच्यात हातात असते. शेवटी या जगात गुणवत्तेची कदर होतेच. तसे नसते तर निरक्षर असणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आज अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून तुमच्यासमोर नसता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सत्यावर निष्ठा ठेवा. जगात अनेक लोक प्रामाणिक आहेत, असे श्री. बनसोडे सांगतात.
आई-बाबा हेच माझे पांडुरंग!
सत्कर्म केले की चांगली फळे वाट्याला येतात. माझे आई- बाबा वारकरी आहेत. मीही वारकरी आहे. मात्र आता पंढरपूरला जाणे होत नाही. आई- वडीलच माझे पांडुरंग आणि रखुमाई आहेत, असे श्री. बनसोडे म्हणतात.
हेही वाचा...