पांढरदेवचे सरपंच चेतन म्हस्के यांच्याविरुद्ध दाखल खाेटे गुन्हे मागे घ्या; अन्यथा आंदाेलन ! अखिल भारतीय सरपंच संघटनेचे चिखली तहसीलदारांना निवेदन..!
Updated: Sep 9, 2025, 21:14 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जलजीवन मिशन अंतर्गंत सुरू असलेल्या पाईपलाईनवरून चिखली तालुक्यातील पांढरदेव येथे वाद झाला हाेता. याप्रकरणी पांढरदेव येथील सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांच्याविरोधात खाेटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटनेने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाइपलाईनच्या कामावरून गावातील तेजराव अंकुशराव खेडेकर यांनी सरपंच चेतन म्हस्के यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सरपंचांनी समजावून सांगत असताना खेडेकर यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला. मात्र या घटनेतून सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर अमडापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये खोटे गुन्हे दाखल केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
हे गुन्हे ताबडतोब मागे घेतले नाहीत, तर अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, मनाेज लाहुडकर, वैशाली संजय गवई यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा पाेलीस अधीक्षक आणि अमडापूरच्या ठाणेदारांनाही देण्यात आल्या आहेत.