अभिमानास्पद! अमोन्याच्या भूमिपुत्राचा गौरव! आयुर्वेद तज्ञ डॉ. पंढरी इंगळे यांना ‘ग्लोबल इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ जाहीर....

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे सुप्रसिद्ध आयुर्वेद वाचस्पती आणि पंचकर्म तज्ज्ञ डॉ. पंढरी इंगळे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा “ग्लोबल इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६” जाहीर झाला आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

चिखली येथील गंगाई हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म अँड रिसर्च सेंटरचे संचालक असलेल्या डॉ. इंगळे यांनी आयुर्वेद चिकित्सा, पंचकर्म, संशोधन, ग्रामीण आरोग्यसेवा आणि समाजजागृती या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील हजारो रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभावी उपचार देत समाजात आयुर्वेदाविषयी नव्याने विश्वास निर्माण केला आहे.
विशेषतः AVN, मणक्याचे विकार, सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, लकवा, स्थूलता तसेच पचनसंस्थेचे आणि जीवनशैलीजन्य आजारांवर त्यांनी केलेले उपचार व संशोधन विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत. पंचकर्म, योग, प्राणायाम, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समन्वय साधत त्यांनी अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय आराम मिळवून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही रुग्ण त्यांच्या उपचारासाठी येत असल्याचे दिसून येते.
डॉ. इंगळे हे केवळ वैद्यकीय तज्ज्ञ नसून प्रेरणादायी वक्ते, संशोधक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. आरोग्य शिबिरे, जनजागृती अभियान, मोफत तपासणी शिबिरे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांपर्यंत आयुर्वेदाचे महत्त्व पोहोचवले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कमी खर्चात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरतो.
दरम्यान, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी या पुरस्काराची घोषणा करत, “वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे,” असे सांगितले.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १० मे २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता नाशिक येथील मालोजीराव मोगल कॉलेज ऑडिटोरियम, गंगापूर रोड येथे पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि वैद्यकीय तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, डॉ. पंढरी इंगळे यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान जाहीर झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून आयुर्वेद क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.