वाह ग्रामसेवक कांबळे गाव काय जहॉगिरी समजलेत की काय??; सरपंच, उपसरपंच वैतागले!; गावाला वेठीस धरले; नक्की चाललं काय?; सारशिवच्या सरपंचांनी “बुलडाणा लाइव्ह’समोर मांडले हाल!!
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामसेवकाच्या छळाला चक्क सरपंच, उपसरपंच वैतागल्याचा प्रकार सारशिव (ता. मेहकर) येथे समोर आला आहे. ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या खोलीत आहे. ते भाडेही पाच महिन्यांपासून थकले आहे. ग्रामसेवक आम्हाला मानसिक त्रास देतात. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सरपंच सौ. रमाबाई जाधव यांनी केली आहे. आज, २ ऑक्टोबरला गांधी जयंती कुलूपबंद ग्रामपंचायतीसमोर साजरी केल्यानंतर त्यांनी प्रेसनोट काढून “बुलडाणा लाइव्ह’ला पाठविली आणि संताप व्यक्त केला.
सरपंचांनी म्हटले आहे, की ग्रामसेवक डी. एच. कांबळे हे सारशिवला रूजू झाल्यापासून गावात येत नाहीत. ठरावांची अंमलबजावणी करत नाहीत. कामचुकारपणा करतात. हेतूपुरस्सर मानसिक त्रास देतात. आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाचे भाडे न दिल्याने मालकाने कुलूप लावले आहे. महात्मा गांधी जयंतीसुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करता आली नाही. गावाला न्याय देण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.