सुरेखा पुणेकरला हवे विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे तिकीट
नांदेड : कलाकार मंडळी राजकारणात येण्यात आता काहीच नावीन्य राहिलेलं नाही. लावणीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राच्या दिलाची धडकन झालेल्या सुरेखा पुणेकर यांना राजकारणात येण्याची तीव्र इच्छा आहे. त्यांनी यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. आता त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी तयारी चालविली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे. महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी ही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सुरेखा पुणेकर यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी तशी चर्चाही केली आहे. रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सुरेखा पुणेकर यांना उमेदवारी दिल्यास या निवडणुकीत आणखीच रंगत येणार आहे.